पांगरीच्या लेकीचा सन्मान! तबसुम शेख यांचा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव
कुतूहल मीडिया ग्रुप
पांगरी : बार्शी तालुक्यातील पांगरी गावाची लेक आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथील उपक्रमशील शिक्षिका तबसुम हाजीमलंग शेख यांना पंचायत समिती, दक्षिण सोलापूर यांच्यातर्फे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सन्मान आमदार सुभाष देशमुख, गटविकास अधिकारी शंकर कवितके, गट शिक्षणाधिकारी जयश्री सुतार, विस्तार अधिकारी गुरुबाळ सनके आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
२१ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य
तबसुम शेख या २०२० पासून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोरामणी येथे कार्यरत असून, त्यांची एकूण २१ वर्षांची सेवा झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान लक्षणीय असून, कोरोना काळात शाळेतील पहिली इयत्तेचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कार्याची दखल घेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांचे विशेष कौतुक केले होते.
स्मार्ट डिजिटल वर्गाची निर्मिती आणि नाविन्यपूर्ण उपक्रम
शेख यांनी लोकसहभागातून स्मार्ट डिजिटल वर्गाची निर्मिती करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या पुढाकारातून स्मार्ट पीडीएफ टॅबवर शिक्षण घेणारे विद्यार्थी, डिजिटल क्लासरूम, “चला करूया गणिताची मैत्री”, “माझा वाढदिवस – ग्रेट देईन”, “शैक्षणिक साहित्याची भेट”, “लर्न इंग्लिश विथ फन” यांसारखे उपक्रम शाळेत राबवण्यात आले. विशेष म्हणजे त्या सेमी इंग्रजी वर्गाला अध्यापन करतात आणि त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांना इंग्रजी वाचनाची उत्तम सवय आहे.
सामाजिक कार्यातही अग्रेसर
फक्त शिक्षणच नव्हे, तर सामाजिक कार्यातही शेख पुढे आहेत. “मायेची सावली” आणि “झाडांची भिशी” यांसारख्या उपक्रमांत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांच्या उल्लेखनीय कार्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती, पालकवर्ग, सरपंच, ग्रामस्थांसह वडील हाजीमलंग शेख, पती जाफर पठाण, भाऊ वाहिद शेख यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.