कुतूहल न्यूज नेटवर्क
पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर याने एमपीएससीची ( MPSC) परीक्षा उत्तीर्ण केली. परंतू तरीही नोकरी न मिळाल्याने या २४ वर्षीय तरुणाने आत्महत्येचे पाउल उचलले. स्वप्निलच्या आत्महत्येचे पडसाद आज राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. स्वप्नीलची आत्महत्या ही अत्यंत वेदनादायी घटना आहे, राज्यात यापुढे अशा कोणत्याही घटना घडू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) 31 जुलैपर्यंत एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरणार असल्याची घोषणा विधानसभेत केली.
MPSC च्या सर्व रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरणार; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी एमपीएससी परीक्षेच्या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “काल कॅबिनेटमध्ये एमपीएससीच्या विषयावर चर्चा करण्यात आली. एसईबीसी संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर एमपीएससीची प्रक्रिया थांबवावी लागली. आता येत्या 31 जुलैपर्यंत राज्यात एमपीएससीच्या सर्व रिक्त जागा भरण्यात येतील त्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.”