वैराग: एकवीस वर्षीय विवाहितेवर अत्याचार केल्याप्रकरणी वाळूज (ता. मोहोळ) येथील दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यातील एकास अटक करण्यात आली असून न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. ही घटना मंगळवारी (दि. ३० मार्च ) सायंकाळी सातच्या सुमारास वैराग- माढा रोडवर घडली.
संभाजी भागवत मोटे व महेश माणिक गुरव दोघे रा. वाळूज (ता. मोहोळ) अशी गुन्हा दाखल झालेल्या इसमांची नावे आहेत. वैराग पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, सुर्डी (ता. बार्शी) येथील पीडित महिला ही आधार कार्ड काढण्यासाठी वैराग येथे आली होती. गावी जाण्यासाठी एसटी बस स्थानकाजवळ थांबली होती. त्या महिलेजवळून संशयित दोघे दुचाकीवरून जात असताना त्या महिलेस आम्ही गावाकडे चाललो आहोत. यायचे का ? असे विचारले, यावरून महिला त्यांचे सोबत दुचाकीवरून निघाली. दोघांनी गाडी गावाकडे न जाता आडवाटेने नेऊन थांबवली व त्यातील एका इसमाने बळजबरीने या महिलेवर अत्याचार केला. याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद वैराग पोलिसांत पीडित महिलेने पतीसह दिली आहे.
यावरून वैराग पोलिसात दोघां इसमाविरोधात गुन्हा दाखल असून गुरव यास अटक करण्यात आली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता ३ एप्रिलपर्यंत तीन दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली असल्याची माहिती तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांनी दिली.