कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर: बार्शी येथील विशाल फटे याच्या भगवंत सहकारी पतसंस्थेतील दोन्ही लॉकर्स उघडण्यात आले. परंतु, पोलिसांना त्या दोन्ही लॉकरमध्ये साधी टाचणीही मिळून आली नाही. दोन्ही लॉकर रिकामेच असल्याची बाब समोर आली आहे. (barshi scam vishal phates locker is empty)
कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या विशाल फटेच्या लॉकरमध्ये साधी टाचणीही नाही
शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जादा पैसे मिळतील, असे अमिष दाखवून विशाल फटे याने सुरवातीला लोकांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त परतावा दिला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून त्याने कोट्यवधी रुपये मिळविले आणि स्वत:साठी महागडी चारचाकी, दोन बंगले बांधले. पोलिस कोठडी मिळाल्यापासून पोलिसांनी केलेल्या तपासात त्याने किती पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतविले, यावर भाष्य केलेले नाही, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली. एका व्यक्तीकडून पैसे घ्यायचे आणि गरज असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला द्यायचे, असेच व्यवहार अधिक केल्याचेही समोर आले आहे.
साई सेक्युरिटी सर्व्हिसेसच्या तंत्रज्ञाला घेऊन पोलिसांनी पंच व फटेच्या समक्ष भगवंत पतसंस्थेतील दोन्ही लॉकर उघडले. मात्र, त्यात काहीच सापडले नाही, दोन्ही लॉकर रिकामेच होते. तक्रारदारांचे कोटीवधी रुपये त्याने नेमके कुठे गुंतवले, यादृष्टीने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उपअधिक्षक संजय बोथे यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे. १ फेब्रुवारीपर्यंत तो पोलिस कोठडीत असून त्याच्याकडून अधिक माहिती घेतली जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.