fbpx

बार्शीचा सिने कलाकार समीर परांजपे कलर्स मराठीच्या लोकप्रिय नायक पुरस्काराने सन्मानित

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी:  बार्शी येथील कलाकार, सिने अभिनेता समीर परांजपे यांना कलर्स मराठीच्या अवार्ड रंगारंग सोहळा या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. परांजपे यांना बहुचर्चित ठरलेल्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालीकेतील ‘अभिमन्युच्या’ भूमिकेसाठी लोकप्रिय नायक या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराच्या स्पर्धेत वाहीनीवरील अनेक मालिकेमधील असंख्य दिग्गज कलाकार सहभागी झाले होते. त्या स्पर्धेतून बार्शीपुत्राने हे घवघवीत यश संपादन केले आहे.

बार्शीसह महाराष्ट्रातील अनेक सिने कलाकार, अभिनेते, राजकीय नेते यांनी परांजपे यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी सुबोध भावे, भरत जाधव असे दिग्गज कलाकार देखील उपस्थित होते. समीर परांजपे हे मूळ बार्शीच्या मातीतील असल्याने बार्शीकरांच्या शिरपेचातही मानाचा आणखी एक तुरा पडल्याचे बोलले जात आहे. समीर हे अत्यंत सर्वसामान्य घरातून आलेला आणि मुंबई सारख्या मेट्रोसिटीत जाऊन अभिनयाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर ठसा उमटवण्याचे काम त्यांनी केले आहे. आई अरुणा परांजपे या बार्शीच्या माजी उपनगराध्यक्ष होत्या. वडील किशोर परांजपे हे बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल येथे हेड इंचार्ज पदावर आहेत. भाऊ सौरभ परांजपे अजूनही शिक्षण घेत आहे. यावेळी बार्शीतील सर्व राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी परांजपे यांचे भरभरुन कौतुक केले आहे.

अभिनेते समीर परांजपे यांची प्रतिक्रिया
अभिनय क्षेत्रात काम करीत असलेल्या कामाची ही पावती आहे. मुळात सुबोध भावे, भरत जाधव यांसारख्या अभिनेत्यांच्या बरोबरीने नामांकन मिळणे हाच खरतर माझ्यासाठी अवॉर्ड आहे. सगळ्या रसिकप्रेक्षकांचे आभार. माझे आई वडील बायको सगळी फॅमिली तसेच माझी शाळा आणि माझं गाव बार्शी जिथे मी लहानाचा मोठा झालो. त्यांचाच माझ्या वाटचालीत मोलाचा आणि अनन्यसाधारण वाटा आहे. अभिनेता म्हणून वेगवेगळ्या धाटणीची उतमोत्तम कामं माझ्या हातून घडोत आणि त्यासाठी तुम्हा सर्वांचे आशीर्वाद हक्काने मागतो आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *