कुतूहल न्यूज नेटवर्क
सोलापूर : ओबीसी आरक्षणासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात सर्वत्र चक्काजाम आंदोलन शांततेत सुरू आहे. काही ठिकाणी आंदोलकाना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सोलापूर शहरासह बार्शी, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, अक्कलकोट आदी तालुक्यात भाजपने आंदोलन केले आहे.
ओबीसी आरक्षणासाठी भाजप आक्रमक; सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी चक्काजाम
सोलापूर शहरात हैदराबाद रस्त्यावर सिद्धेश्वर मार्केट यार्ड समोर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आमदार विजय देशमुख शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या नेतृत्वात विविध आघाड्यांचे प्रमुख नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. जवळपास दीड तास चक्का जाम आंदोलन झाल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती. मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या.
हैदराबाद रस्त्याच्या चक्काजाम आंदोलनामुळे विजापूर कडून तसेच पुणे रस्त्यावरून हैदराबादच्या दिशेने जाणारी वाहन आहे तिथेच थांबवण्यात आली होती, पोलिसांनी दोनशेवर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल आहे. आमदार विजय देशमुख आणि विक्रम देशमुख यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना ही ताब्यात घेण्यात आलं आहे.
बार्शी शहरातील लातूर-कुर्डूवाडी रस्त्याच्या पोस्ट चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आलं. आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात विविध आघाड्यांचे प्रमुख नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. जवळपास एक तास चक्का जाम आंदोलन झाल्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली होती.