कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद: आसिफ मुलाणी
उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी, लासोना ,सांगवी, कामेगाव, राजे बोरगाव, बोरखेडा, कनगरा आदी गावामध्ये पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली. पावसामुळे शेतकर्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. तसेच अनेक रस्ते व रस्त्यावरील पुलाचे नुकसान झाले आहे. अनेक शेतांना तलावाचे स्वरूप आले आहे. पावसामुळे तेरणा आणि सवळा नदी संगम या दोन्ही नद्या भरून वाहू लागले आहेत.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी
या अतिवृष्टीमुळे लासोना गावातील एक व्यक्ती गावाकडे परतत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने समुद्रवाणी-लासोना या पुलावरून वाहून गेला आहे. अशीच घटना बोरखेडा गावालगत असलेल्या ओढ्यावरील पुलावरून एक मोटरसायकल वाहून गेली असून एक युवक बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे.
प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन बेपत्ता व्यक्तींना शोधण्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. जिल्हाध्यक्ष काळे यांनी या गावांना भेट देऊन तेथील शेती, रस्ते आणि पूलांच्या समस्यांचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे, नेताजी पाटील, बांधकाम सभापती दत्तात्रय देवळकर यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी यावेळी उपस्थित होते.