चिपळूण : लोटे एमआयडीसीतील घरडा कंपनीत आज सकाळी प्रचंड मोठा स्फोट झाला. या अपघातात तब्बल सहा जण गंभीररित्या भाजले. यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्याम मृत्यू झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, मात्र अपघाताची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रुग्णवाहिका मागवण्यात आल्या. त्यानंतर तत्काळ अपघातातील जखमींना खेड तालुक्यातील कळंबणी उप जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. लोटे एमआयडीसीमध्ये एका आठवड्यात कंपनीत स्फोट होण्याची ही दुसरी घटना आहे. काही दिवसापूर्वी सुप्रिया केमिकल कंपनीमध्ये स्फोट होऊन आग लागली होती. लोटे अग्निशमन दलाने ही आग तत्काळ विझवली. मात्र कंपनीतील तिघे जण गंभीररीत्या भाजले होते. यातील एकावर सांगलीला तर दुसऱ्यावर चिपळुणातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. ही आग शांत होत असतानाच आज लोटे एमआयडीसीतील सर्वात मोठी अशी ओळख असलेल्या घरडा कंपनीत स्फोट झाला. या अपघाताची माहिती मिळताच लोटे अग्निशमन केंद्राच्या दोन गाड्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत. अपघातातील मृत आणि जखमींची नावे समजलेली नाही.