काशीनाथ क्षीरसागर : कुतूहल न्यूज नेटवर्क
मोहोळ- वाळूज येथे अज्ञात प्राण्याच्या हल्ल्यात दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू
मुंगशी : वाळूज ता. मोहोळ येथील खरात वस्तीवर मंगळवारी दुपारच्या सुमारास अज्ञात प्राण्याने केलेल्या हल्लात एका दहावर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
अनिकेत अमोल खरात वय (१०) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मयत अनिकेत हा लहान भावंडासोबत वस्तीवर खेळत होता. दरम्यान, अनिकेत हा प्रांतविधीसाठी मक्याच्या शेतामध्ये गेला असता परत येताना अज्ञात प्राण्याने त्याला मक्याच्या फडात ओढत नेले. तेंव्हा इतर भावंडांनी आरडाओरड केली.
याबाबत माहिती मिळताच आई,वडील व आजोबा शेतात पोहचले तेंव्हा मुलाच्या डोक्यातून रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले. तात्काळ त्यास प्राथमिक आरोग्य केंद्र मोहोळ येथे उपचारासाठी दाखल असता डॉक्टरांनी अनिकेत यास मृत्य घोषित केले.
वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, कोणत्या प्राण्याने हल्ला केला हे अद्याप समजू शकले नाही.या घटनेची नोंद मोहोळ पोलीस स्टेशन येथे झाली आहे.