fbpx

केम येथे विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन शिबीर संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क
करमाळा: केम येथील सुयश क्लासेस व बार्शी येथील स्पर्धामित्र ॲकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करीअर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. करीअर निवडताना विद्यार्थांनी सर्व पर्यायांचा विचार करावा व आपल्या आवडीच्या क्षेत्रात करीयर करावे, असे प्रतिपादन स्पर्धामित्र ॲकॅडमीचे संचालक व कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आसिफ शेख यांनी केले.

ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणासंबंधी जागरूक होत असल्याचे दिसुन येते. परंतु कोणती शाखा निवडावी, नोकरी मिळविण्याचे कोणकोणते मार्ग उपलब्ध आहेत, स्पर्धा परीक्षा देण्यासाठी तयारी कधी व कशी करावी अशा अनेक प्रश्नांची इत्थंभूत माहीती विद्यार्थ्यांना देण्यासाठी या मार्गदर्शन शिबीराचे आयोजन सुयश क्लासेसतर्फे करण्यात आले होते. पोलिस भरती, बॅंक परीक्षा, एम.पी.एस.सी परीक्षा, वनखाते, तलाठी भरती, एन.डी.ए, स्टाफ सिलेक्शन भरती आदी अनेक परीक्षांचे स्वरूप व पद्धती शेख यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली. पदवीचा अभ्यास करताना समांतररीत्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचे निरसन केले. केम परीसरातील पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक विद्यार्थी आवर्जुन कार्यक्रमाला उपस्थित राहीले व तयारी करताना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा केली.

अशा शिबीरांमुळे केम व आसपासच्या परिसरातील ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना करीयर निवडीसाठी निश्चित योग्य दिशादर्शन होईल, असे मत कार्यक्रमाचे आयोजक वसंत तळेकर यांनी व्यक्त केले. केम, करमाळा, परंडा, वैराग, कुर्डुवाडी आदी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अधिकारी बनायला हवे या ध्येयापोटी शेख यांनी बार्शी शहरात उत्तम प्रकारचे व पुण्याच्या धर्तीवर स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्र उभारले आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुण्याला जाणे शक्य नाही, आर्थिक परिस्थिती हालाखीची आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे मार्गदर्शन केंद्र दिपस्तंभाप्रमाणे काम करत आहे व अनेक विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी एकत्रित प्रयत्न करून ग्रामीण भागातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी प्रयत्न करू असा संकल्प केम येथील सुयश क्लासेसचे वसंत तळेकर व स्पर्धामित्र ॲकॅडमीचे शेख  यांनी केला.

कार्यक्रमासाठी साडे येथील कलाशिक्षक विजय गुंड यांनी आवर्जुन उपस्थिती दर्शविली. शंकर ढगे यांनी मान्यवरांचे सत्कार केले. वाईकर, धवल पाटील, पवार कार्यक्रमाला उपस्थित होते.
(Career guidance camp for students at Kem)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *