दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
सराफ दुकानांवर दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगारी टोळी गजाआड;वाकड पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
पिंपरी-चिंचवड : खून, दरोडा, जबरी चोरी यांसारख्या अनेक गुन्ह्यात मागील १५ वर्षांपासून फरार असलेल्या गुन्हेगारी टोळीला काल वाकड पोलिसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तब्बल पाऊण किलो सोने, एक क्विंटल चांदी, तीन कार, पाच जिवंत काडतुसे आणि एक गावठी पिस्तूल असे एकूण १ कोटी ११ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलिसांनी केलेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे सर्वत्र कौतुक होत आहे.विकीसिंग जालिंदरसिंग कल्याणी (वय ३१, राहणार रामटेकडी, हडपसर) विजयसिंग आंधासिंग जुन्नी ( वय १९, रा कल्याण) अशी अटक केलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत.
मागील महिन्यात २० सप्टेंबरला वाकड येथील पीर आर ज्वेलर्स नावाचा सराफ दुकान फोडून तीन किलो चांदी व सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच दिवशी निगडी येथील नवकार ज्वेलर्स मधून २० किलो चांदीचे दागिने व २६ सप्टेबर ला पिंपरी येथील दुर्गा ज्वेलर्स फोडून पाऊण किलो चांदी चोरीला गेल्याचे गुन्हे नोंद झाले होते.लागोपाठ होत असलेल्या चोरीच्या प्रकाराला ब्रेक लावण्याचे मोठे आव्हान पिंपरी-चिंचवड पोलिसांसमोर होते. वाकड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक हरिश माने व उप निरीक्षक सिध्दनाथ बाबर यांनी एक विषेश पथक तयार करून तपास सुरू केला. अखेर गुन्हेगारांना पकडण्यात वाकड पोलिसांना मोठे यश आलेआहे.