fbpx

सिताफळ किंग डॉ. कसपटे यांना आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टरेट बहाल

कुतूहल न्यूज नेटवर्क 
बार्शी:
एनएमके-१ गोल्डन सिताफळाचे निर्माते डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांच्या संशोधनाची दखल आता जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. किंगडम ऑफ टोंगा या देशातील राष्ट्रकुल विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाची डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी नुकतेच बहाल करून त्यांना सन्मानीत केले.

बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील सीताफळ किंग, एनएमके-१ गोल्डन या सीताफळ वाणाचे निर्माते व अखिल भारतीय सीताफळ महासंघाचे अध्यक्ष डॉ. नवनाथ कसपटे यांना टोंगा या ओशनिया खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर रविवार, दि. ११ जुलै रोजी दिल्ली येथे एका कार्याक्रमात डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी सन्मानपूर्वक बहाल केली.

या सन्मानामुळे डॉ. कसपटे यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला असून, चक्क परदेशातील एका विद्यापीठाने डॉ. कसपटे यांनी विकसित केलेल्या आणि जगभर प्रसिद्ध होत असलेल्या एनएमके-१ गोल्डन या सीताफळ वाणाची दखल घेवून त्यांना कृषी क्षेत्रातील डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली आहे. डॉ. कसपटे यांना या संदर्भात मिळणारी ही दुसरी डॉक्टरेट असून, यापूर्वी त्यांना बेंगलोर विद्यापीठाने डॉक्टरेट पदवी बहाल करून सन्मानीत केले होते.

किंगडम ऑफ टोंगा या ओशनिया खंडातील देशातील माकंगा येथील राष्ट्रकुल व्यवसायिक विद्यापीठाच्या विशेष निवड समितीच्या वतीने कोवीडच्या पार्श्वभूमीवर दिल्ली येथील उद्योग विहार परिसरातील रॅडीसन या पंचतारांकीत हॉटेलमध्ये एका खास समारंभात विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रिपू रंजन सिंन्हा यांच्या हस्ते कसपटे यांना डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी बहाल केली.

यावेळी विद्यापीठाचे संस्थापक सदस्य प्रोफेसर राकेश मित्तल, डॉ. प्रियदर्शनी नायर, केंद्रीय मंत्रालय प्रतिनिधी सैफी अख्तर आदी मान्यवर उपस्थित होते. किंगडम ऑफ टोंगा हा देश ओशनिया खंडाच्या पॉलिनेशिया भागातील एक छोटा द्विपसमूह देश असून, तो दक्षिण प्रशांत महासागरातील १७६ लहान बेटांवर वसला आहे. या देशाने डॉ. कसपटे यांच्या एनएमके १ गोल्डन या सीताफळ वाणासाठी केलेल्या संशोधनाची दखल घेवून हा गौरव केला आहे. टोंगा येथील कृषी विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्री. कौसा यांनी केलेल्या सुचनेवरून डॉ. कसपटे यांना ही डॉक्टरेट बहाल करण्यात आली असून, विशेष म्हणजे, डॉ. कसपटे यांना या सन्मानाबरोबरच टोंगा देशाचे सर्व अधिकार आणि विशेषाधिकार देण्यात आले आहेत.

डॉ. नवनाथ कसपटे हे गेल्या 45 वर्षापासून सीताफळ शेतीमध्ये काम करत असून, त्यांनी विकसित केलेल्या आणि जगप्रसिद्ध होत असलेल्या एनएमके १ गोल्डन या सीताफळ वाणाला पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा कलम २००१ अन्वये स्वामीत्व हक्क प्राप्त झाला आहे. शिवाय डॉ. कसपटे यांनी त्यांच्या मधुबन फार्मवर हस्तपरागीकरणाचा यशस्वी प्रयोग केला असून, त्यातून निर्माण झालेल्या नवीन २५०० वाणाची लागवड केली आहे. हे वाण सध्या प्रयोगावस्थेत आहेत. एनएमके १ गोल्डन या वाणाची लागवड केल्यामुळे अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांना करोडपती केले असून संपूर्ण देशातच नव्हे तर परदेशातूही या वाणाला मागणी वाढत आहे. देशात होत असलेल्या सिताफळ लागवडीमध्ये तब्बल ८० टक्के वाटा हा एनएमके-१ गोल्डन या वाणाचा आहे. असा हा महत्त्वपूर्ण वाण विकसित केल्याबद्दल डॉ. कसपटे यांना ही डॉक्टर ऑफ सायन्स पदवी बहाल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *