कुतूहल मीडिया ग्रुप
पुणे: सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेच्या मूल्यांसाठी कार्यरत असलेल्या दलित पँथर संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी समाधान बबन माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. स्वप्निल ढसाळ यांच्या स्वाक्षरीने अधिकृतपणे जाहीर झाली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे संघटनेच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होत आहे.
दलित पँथरच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी समाधान माने यांची निवड
समाधान माने हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रीय असून, त्यांनी विविध आंदोलनांद्वारे वंचित, दलित आणि शोषित घटकांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या कर्तबगारीमुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिली आहे.
नियुक्तीनंतर समाधान माने म्हणाले, “दलित पँथर संघटनेचे विचार, शिस्त, कार्यसंस्कृती आणि सामाजिक बांधिलकी या मूल्यांना मी प्राधान्य देईन. सर्वधर्म समभाव, समानता आणि स्वाभिमान यासाठी झटण्याची ही एक मोठी संधी आहे. युवकांमध्ये जागृती निर्माण करून संघटना अधिक प्रभावी करण्याचा मी प्रयत्न करेन.”
संघटनेचे संस्थापक पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या विचारांना पुढे नेण्याचा आणि नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा त्यांचा संकल्प स्पष्ट जाणवत आहे. पक्षाच्या ध्येयधोरणानुसार समाजात समतेची भावना निर्माण करून वंचितांसाठी कार्यरत राहणे, हेच त्यांच्या नेतृत्वाचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
या नियुक्तीप्रसंगी केंद्रीय महासचिव डॉ.संगीता ढसाळ, राज्य समन्वयक अक्षय अडसूळ, नवी मुंबई अध्यक्ष सचिन भोसले, दीपक वाघमारे, ताजूभाई पठाण, जावेद पठाण आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन जबाबदारीच्या निमित्ताने युवा उद्योजक आदित्य वाघमारे, फिरोज पठाण यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी समाधान माने यांना शुभेच्छा दिल्या आणि आगामी कार्यकाळात यशस्वी वाटचालीसाठी समर्थन दर्शवले.
पश्चिम महाराष्ट्रात दलित पँथरचे विचार अधिक ठामपणे रुजविण्यासाठी आणि संघटनेच्या प्रभावी विस्तारासाठी माने यांचे नेतृत्व निर्णायक ठरेल, असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.