कुतूहल न्यूज नेटवर्क
पुणे, दि.15 : सोलापूरचे पालकमंत्री बदलण्याची आवश्यकता नसून दत्तात्रय भरणे हेच सोलापूरचे पालकमंत्री कायम राहणार असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. सोलापूरचे पालकमंत्री बदलण्याची मागणीही झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणेच राहणार सोलापूरचे पालकमंत्री : जयंत पाटील
उजनीच्या पाणी प्रश्नासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सोलापूर आणि इंदापूरमध्ये संघर्ष पाहायला मिळत आहे. उजनी घरणातील 5 टीएमसी पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्य सरकारच्या या निर्णयाला सोलापूरकरांकडून मोठा विरोध करण्यात आला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात सोलापुरात जोरदार आंदोलनंही करण्यात आली.
वाद पेटत असल्याचं लक्षात आल्यानंतर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवण्याचा निर्णय रद्द केल्याचं 19 मे रोजी जाहीर केलं होतं. त्यावर आज जयंत पाटील यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी इच्छा व्यक्त केली होती. त्यावर आज निसर्ग मंगल कार्यालयात बैठक पार पडली.