ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करणाऱ्या बार्शी पोलिसांचा गौरव
कुतूहल मीडिया ग्रुप
बार्शी: बार्शी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत एक मोठी कामगिरी बजावली आहे. या उल्लेखनीय तपास आणि कारवाईबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक, कोल्हापूर परिक्षेत्र यांच्या हस्ते बार्शी पोलिसांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले आहे.
दि. १७ एप्रिल २०२५ रोजी गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली खास पथक तयार करण्यात आले. परांडा रोडवर सापळा रचून ३ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातून २०.०४ ग्रॅम एम.डी. ड्रग्स, गावठी पिस्तूल, जिवंत राऊंड, मोबाईल हँडसेट, रोख रक्कम, वजन काटा व टोयोटा कार असा सुमारे १८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तांत्रिक विश्लेषण आणि तपासादरम्यान १३ आरोपींना निष्पन्न करण्यात आले असून त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे.
या कार्यवाहीमुळे अमली पदार्थ विरोधी अभियानाला चालना मिळाली असून, पोलिसांच्या दक्षतेचे, कौशल्याचे व प्रभावी समन्वयाचे हे उदाहरण ठरले आहे.