कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: गौडगाव ता. बार्शी येथे ई-पीक पाहणी यासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी गौडगाव येथे कार्यशाळा पार पडली. महसूल विभागाच्या वतीने ई-पीक पाहणी हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने तहसीलदार सुनिल शेरखाने यांनी गौडगाव येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी संबंधी मार्गदर्शन केले.
गौडगाव येथे ई-पीक पाहणी कार्यशाळा संपन्न
प्रत्येक शेतकरी शेतात केलेल्या पिकांची नोंद, बांधावरील झाडाची नोंद, सिंचनाची नोंद स्वतः मोबाईल ॲप वरून करू शकणार आहे. या पीक नोंदीवरून पुढील सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडणार आहेत. त्यामुळे सर्वांनी ॲप घेऊन आपला पिक पेरा नोंदवण्याचे आव्हान तहसीलदार यांनी केले.
एका मोबाईल वरून २० शेतकऱ्यांच्या पीक नोंद करता येणार आहे. म्हणजे ज्याच्याकडे मोबाईल नाही, त्यांनी इतरांकडून पिक पेरा नोंद करून घेता येणार आहे. त्याच बरोबर आता स्वयंघोषणा पिक-पेरा ही संकल्पना बंद होऊन, आपला सातबारा आपण स्वतः नोंद करणे सुलभ झाले आहे.
यावेळी मंडळ अधिकारी राजेंद्र भोसले, बालाजी पैकेकर, हिराचंद शिंदे, राहुल भड, नागेश काजळे, गौडगावचे तलाठी ज्ञानेश्वर वाघमारे, रुईचे तलाठी प्रकाश जगताप, जळगावचे तलाठी दत्तात्रय देशमाने, भालगावचे तलाठी डी.एन. देशमुख, कुमार पाटील, जीवन भड, युवराज काजळे, गुलाब कोतवाल आदी शेतकरी उपस्थित होते.