fbpx

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन शेतकऱ्यांनी खरीपाचा विमा भरावा; आमदार राणाजगजितसिंह पाटील

कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद:आसिफ मुलाणी
दोन दिवसांपूर्वी उस्मानाबाद तालुक्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाला. या पावसाने जीवितहानी बरोबरच शेतीचे व सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वारंवार नैसर्गिक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या वर्षी विमा मिळाला नाही म्हणून निराश न होता या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा बोध घेऊन खरीप २०२१ चा पिक विमा हप्ता भरुन पिके संरक्षीत करुन घेण्याचे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शेतकरी बांधवांना केले.

अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील बांध फुटुन माती वाहून गेली, अनेकांच्या शेतात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण होत पाणी साचले आहे. खरीप पिकांचे यात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणचे रस्ते व पुलांचे नुकसान झाले आहे. या अनुषंगाने कामेगाव, बोरखेडा, सांगवी, समुद्रवाणी, मेंढा, घुगी, लासोना, टाकळी (बें.), बोरगांव (राजे), कनगरा या गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व झालेल्या नुकसानीपोटी केंद्र/राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या माध्यमातून लवकरात लवकर भरीव मदत मिळवून देण्याचा विश्वास शेतकरी बांधवांना दिला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी पिक विमा भरला आहे. त्यांनी FARMITRA या मोबाईल ॲपवर अथवा टोल फ्री क्रमांक १८००२०९५९५९ वर नुकसानीची सूचना देण्याचे आवाहन केले.

सदर नैसर्गिक आपत्तीमध्ये बोरखेडा येथील युवक समीर शेख यांचा वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर लासोना येथील बबन रसाळ या वाहून गेलेल्या व्यक्तीचा अद्याप शोध सुरु आहे. महसूल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून त्यांना शोधण्यासाठी परिश्रम घेण्यात येत आहेत. पीडित कुटुंबियांना भेटून त्यांचे सांत्वन करून शासनाकडून आर्थिक मदतीची ग्वाही दिली. लासोना येथील शेतकरी परमेश्वर स्वामी व प्रशांत नाईकनवरे यांनी शेडनेटमध्ये मोठ्या कष्टाने जोपासलेल्या सिमला मिरचीच्या शेडनेटमध्ये पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यांची देखील भेट घेऊन नुकसानीची पाहणी केली व धीर दिला.

महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेती, पिके व मालमत्तेचे झालेले नुकसान पंचनाम्यातून स्पष्ट होईल व पंचनामे पूर्ण होताच शासनाकडे तात्काळ मदतीची मागणी करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी महसूल व कृषी विभागाच्या माध्यमातून नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत व त्याची प्रत घ्यावी. या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीतून खरीप पिके संरक्षित करण्याची गरज अधोरेखीत होत आहे. परंतु या वर्षी पिकविमा भरण्याकडे शेतकऱ्यांचा कल कमी झाल्याचे दिसून येत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी खरीप हंगामात आतापर्यंत केवळ २५ टक्के शेतकऱ्यांनीच पिक विमा भरला आहे. गेल्यावर्षी विमा मिळाला नाही म्हणून शेतकऱ्यांनी नाउमेद होऊ नये, हा विमा मिळवून देण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरु आहेत. वातावरणीय बदलामुळे ढगफुटी, पावसातील खंड अशा नैसर्गिक आपत्तींचा भविष्यातही सामना करावा लागू शकतो. त्यामुळे या नुकसानीचा बोध घेता पिक विमा न भरणे हा निर्णय आर्थिकदृष्ट्या चुकीचा ठरू शकतो. शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा हप्ता भरुन पिके संरक्षीत करुन घ्यावीत, असे आवाहन सर्व शेतकरी बांधवांना केले तसेच या सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यभरातील तमाम बळीराज्याला देखील हेच आवाहन आहे की, आपला पिकविमा भरून आपले पीक संरक्षित करा.

अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान फारच हृदयद्रावक आहे मात्र आपण यातून नक्की मार्ग काढुया. शासन स्तरावर यासंबंधीचा संपूर्ण पाठपुरावा करण्यात येईल तसेच प्रत्येक शेतकरी बांधवाला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *