कुतूहल न्यूज नेटवर्क
डॉ. कलाम पुरस्कारासाठी राज्यातील पाच विद्यार्थ्यांची झाली निवड
सोलापूर प्रतिनिधी : भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिनिमित्त अहमदाबाद येथील हनी बी नेटवर्क, सृष्टी व ग्यान यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम इग्नायटेड माईंड चिल्ड्रेन क्रिएटिव्हिटी ऍण्ड इनोवेशन अवार्डची घोषणा झाली आहे. यासाठी देशातील 15 विद्यार्थी निवडले आहेत. त्यापैकी सर्वाधिक पाच विद्यार्थी महाराष्ट्रातील असून त्यांनी राज्याचा नावलौकिक वाढविला असल्याची माहिती सृष्टीचे महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी व सर फाउंडेशनचे राज्य समन्वयक सिद्धाराम माशाळे व बाळासाहेब वाघ यांनी दिली.
राज्यातील पुरस्कार विजेत्यांची नावे
जुई केसकर (द ऑर्किड स्कूल, बाणेर, पुणे), श्रेयस गेडाम (ज्ञानेश्वर विद्यालय सालेभाटा, ता. लाखानी, जि. भंडारा), अनिकेत काकडे ( स्कूल ऑफ स्कॉलर्स, यवतमाळ), यश क्षीरसागर (मालोजीराजे विद्यालय, लोणंद, ता. खंडाळा जि. सातारा), गणेश बोधिसत्व (केंद्रीय विद्यालय, यवतमाळ).
विद्यार्थ्यांमधील प्रयोगशीलता व नाविन्यतेला वाव देण्यासाठी ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. यावर्षी या स्पर्धेत 22 राज्यातून नऊ हजार विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रयोग प्राप्त झाले होते. सर फाउंडेशनकडून एक हजारापेक्षा जास्त प्रयोग पाठविले होते. त्यातून 15 प्रयोगांची निवड केली आहे. या स्पर्धेत पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थी व शाळाबाह्य विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशिका पाठविल्या होत्या. पुरस्कारासाठीच्या समितीत सृष्टी व हनी बी नेटवर्कचे संस्थापक पद्मश्री अनिल गुप्ता, आयआयटी दिल्ली येथील प्रोफेसर पी. व्ही. एम. राव, सी. एस. आय. आर. चे डॉ. विश्वजना सतीगिरी, आयआयएम अहमदाबाद येथील प्रोफेसर व सर रवी जे. मथाई सेंटर फॉर एज्युकेशनल इनोवेशनचे चेअरमन विजय शेरीचंद, आयआयएम अहमदाबाद येथील प्रोफेसर अंबरीश डोंगरे, प्रमिला डीक्रूज, नैशनल इनोवेशन फाउंडेशनचे संचालक डॉ. विपिनकुमार, वैज्ञानिक डॉ. नितीन मौर्य आणि ग्यान संस्थेचे सीईओ डॉ. अनामिका डे यांचा सहभाग होता. यांच्या निवड समितीने ही निवड जाहीर केली. यामध्ये नऊ राष्टीय पुरस्कार व सहा उत्तेजनार्थ पुरस्कार दिले आहेत. या यशाबद्दल बाल वैज्ञानिकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे पद्मश्री अनिल गुप्ता, समन्वयक चेतन पटेल, सर फाउंडेशनच्या राज्य समन्वयक हेमा शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.