मुंबई : माजी खासदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष एकनाथ गायकवाड (Eknath Gaikwad) यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांचे ते वडील होत.
एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासू त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. एकनाथ गायकवाड हे काँग्रेसकडून दोनवेळा संसदेवर निवडून गेले होते. ते १४ व्या आणि १५ व्या लोकसभेचे खासदार होते. गायकवाड यांनी मुंबई दक्षिण मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. २०१४ मध्ये त्यांना शिवसेनेचे राहुल शेवाळे यांनी पराभूत केले होते. गायकवाड हे धारावी मतदारसंघातून तीनवेळा विधानसभेत निवडून गेले होते. तर दोनवेळा राज्याचे कॅबिनेट मंत्रिपद भूषविले होते.