कुतूहल न्यूज नेटवर्क
रेमडेसिवीरच्या नावाने पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे पाणी,बारामतीत टोळीचा पर्दाफाश
बारामती : राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा भासत आहे. चिंताग्रस्त रुग्णांचे नातेवाईक एका इंजेक्शनसाठी इथून तिथून धावपळ करत आहे. मागेल ती किंमत द्यायला रुग्णांचे नातेवाईक तयार आहेत. मात्र इंजेक्शनच शिल्लक नसल्याने मोठं संकट उभं राहिलं आहे. मात्र अशा बिकट परिस्थितीतही काहींना पैसे कमावणे महत्वाचं वाटत आहे. त्यातून बारामतीत बनावट रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणाऱ्या टोळीचा पोलिसांना पर्दाफाश केला आहे. रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटलीत पॅरासिटामोलच्या गोळ्यांचे द्रावण भरून एक इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री केली जात होती. याप्रकरणी पोलिसांना चार आरोपींना अटक केली आहे.
पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलिस निरीक्षक महेश विधाते, पोलीस हवालदार राजेंद्र जाधव, पोलीस नाईक रमेश भोसले, दीपक दराडे, निखिल जाधव यांच्या पथकाने सापळा रचत पोलिसांनी बारामती शहरातील फलटण चौकात दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून आणखी माहिती घेतल्यास चौघांची टोळी या कामात सक्रिय असल्याची बाब समोर आलीय.
इंजेक्शन विक्रीसाठी आलेल्या प्रशांत सिद्धेश्वर घरत (रा. भवानीनगर, ता. इंदापूर) आणि शंकर दादा भिसे (रा. काटेवाडी, ता. बारामती) या दोघांनी मुख्य सूत्रधार दिलीप ज्ञानदेव गायकवाड (रा. काटेवाडी, ता. बारामती) आणि संदीप संजय गायकवाड (रा. भिगवण, ता. इंदापूर) यांच्या सहकार्याने हे इंजेक्शन विक्री करत असल्याची कबुली पोलिसांना दिली. यातील प्रशांत घरत आणि शंकर भिसे हे दोघे इंजेक्शन विक्री करत. तर विमा सल्लागार असलेला दिलीप गायकवाड हा या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून काम करत होता.