fbpx

मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया (ऑपरेशन) ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे सुरू करण्यात यावे म्हणून मुख्यमंत्र्यांना निवेदन

खाजगी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेला दहा हजारांपासून एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो

कुतूहल न्यूज नेटवर्क

पांगरी : सध्या कोरोनासारख्या जागतिक संकटामुळे जग ठप्प झाले आहे.पूर्वीप्रमाणे एकही क्षेत्रात ठरल्याप्रमाणे कामे होत नाहीत.पूर्वी डोळ्यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पुणे येथे मोठ्या प्रमाणात चालू होते. हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे.ती सेवा सध्या पुणेशहर कोरोनामुळे रेडझोन व हॉटस्पॉट मध्ये असल्याने हजारो गोरगरीब लोकांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत.पुढे चालून डोळ्याचे ऑपरेशन वेळेत न झाल्यामुळे ते घातक ठरणार आहे व रुग्णांना अंधत्व येण्याचा मोठा धोका आहे.मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय पांगरी येथे सुरू करण्यात यावे म्हणून मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री व इतर मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना ई मेलव्दारे पत्र पाठवण्यात आले आहे.

ही बाब पांगरी येथील ग्राहक समिती महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्ष श्री.विष्णू बाजी पवार यांनी ग्रामीण रुग्णालय पांगरी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.रवींद्र माळी यांच्या नजरेस आणून दिली.त्यांनाही बाब पटली व कोरोनामुळे बंद असलेली सेवा योग्य ती काळजी घेवून पुर्वरत सुरु करण्याचे ठरले. त्याप्रमाणे डोळे तपासणे, डोळ्यात ड्रॉप घालणे,चष्माचा नंबर काढून देणे ही प्राथमिक सेवा सुरू झाली.ऑपरेशनची सुविधा” पुण्याऐवजी ग्रामीण भागातच सुरू करण्याबाबत पांगरी येथील सुज्ञ ग्रामस्थांनी संकल्प केला आहे.

पांगरी ता बार्शी जि.सोलापूर हे गांव व पंचक्रोशी आणि परिसरातील ३०००० च्या आसपास लोकसंख्येने  व्यापला आहे.पांगरी गांव जिल्हा परिषद गटात मुख्यगांव असुन या गटात २७ गावांचा समावेश आहे,हा सर्व भाग व परिसर ग्रामीण असुन येथील ग्रामीण रुग्णालयावर अवलंबून आहेत.पांगरी गांव पुणे – लातूर राज्य क्र.१४५ वरती वसलेले आहे.हा मार्ग गांवातून जात आहे.तसेच उस्मानाबाद जिल्हा हद्द ही पांगरी गांवापासून ४ – ५ कि.मी.आहे.आणि उस्मानाबाद शहर हे २५ कि.मी.अंतरावर आहे. पांगरी ग्रामीण रुग्णालयात दोन इमारती उपलब्ध आहेत.दोन्हीही इमारतीत ओपरेशनसाठी व रुग्णास थांबण्यासाठी पुरेशी जागा आहे.

पांगरी येथील रुग्णालयात मोतीबिंदूची ओपरेशन सेवा सुरु केल्यास या परिसरातील ग्रामीण डोळ्यांच्या रुग्णांची सोय होणार आहे.ही सेवा घेण्यासाठी पूर्वी रुग्णांना २५० ते ३०० कि.मी चा प्रवास करावा लागत होता.शिवाय तांत्रिक अडचणी आल्यास रुग्णांना तोंड द्यावे लागत होते.या सर्व अडचणीचा विचार करून पांगरी व परिसरातील नागरिकांनी शासनाकडे या योग्य मागणीचा पाठपुरवा करण्यासाठी एक कृती समितीची स्थापना केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *