कुतूहल न्यूज नेटवर्क
सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणपतराव देशमुख यांच्यावर सांगोला येथील सूतगिरणी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास वृद्धापकाळाने सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले होते. ते ९४ वर्षाचे होते.
जेष्ठ नेते गणपतराव देशमुख अनंतात विलीन, अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर
शासकीय इतमामात गणपतराव देशमुख यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अखेरचा निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झाले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे भाई गणपतराव देशमुख अमर रहे च्या घोषणा दिल्या. गणपतराव देशमुख यांचा चिरंजीव पोपटराव देशमुख यांनी दुपारी तीन वाजता मुखाग्नी दिला.
शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनानं मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे. राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांचा मार्गदर्शक दीपस्तंभ ढासळला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातलं अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून गणपतराव आबा कायम स्मरणात राहतील. भावपूर्ण श्रद्धांजली! गणपतराव आबांनी अर्ध्या शतकाहून अधिकच्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा कायम जपली. महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक चळवळीला सुसंस्कृत चेहरा दिला. त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांनी महाराष्ट्र विधिमंडळाचा गौरव वाढवला. महाराष्ट्रानं सद्गुणी सुपुत्र गमावला आहे. अजित पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य.
ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. माझे त्यांच्याशी अतिशय जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांचे जाणे ही माझी वैयक्तिक हानी आहे. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात सामान्य माणसासाठी लढाई केली. गरीब, शेतकरी, शेतमजुरांसाठी संघर्ष केला. दुष्काळी भागासाठी कायम संघर्ष केला. ज्यांची भाषणे ऐकून आम्हाला महाराष्ट्र समजला ते गणपतराव देशमुख होते. इतकी वर्षे राज्य विधानसभेत काम करताना त्यांनी कधीही आपल्या विचारांशी प्रतारणा केली नाही. कधी कोणती तडजोड केली नाही. गणपतराव देशमुख यांच्या भाषणांचा एक वेगळा प्रभाव असायचा. संपूर्ण सभागृह त्यांचे भाषण तन्मयतेने ऐकायचे. ते भाषण म्हणजे एक शिकवण असायची. त्यांनी संघर्ष केलेल्या दुष्काळी भागात आम्ही पाणी पोहोचविले तेव्हा आम्हाला आशीर्वाद देताना त्यांनी मागे-पुढे पाहिले नाही. त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केले. दुसरे गणपतराव देशमुख आता होणे नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांचे आप्तस्वकीय आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार बबनराव शिंदे, आमदार समाधान आवताडे, आमदार अनिल बाबर, शेकापचे जयंत पाटील, सचिन कल्याण शेट्टी, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार सुमनताई पाटील, सांगलीचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगोलाच्या नगराध्यक्ष राणीताई माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी मंत्री अण्णा डांगे, राम शिंदे, लक्ष्मणराव ढोबळे, माजी आमदार राजन पाटील, रामहरी रूपनवर, दीपक साळुंखे-पाटील, प्रकाश शेंडगे, नारायण पाटील, राजेंद्र देशमुख, दत्तात्रय सावंत, उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदींनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.