कुतूहल न्यूज नेटवर्क
ऊन, वारा, थंडी, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता अविरतपणे सतत ३० वर्षे पांगरीकरांना वृत्तपत्राव्दारे सेवा पुरवणारे सामान्यातील असामान्य माणूस म्हणजेच तात्या (कृष्णाथ) रामचंद्र बोधे. केवळ पांगरीच नव्हे तर पांगरी पंचक्रोशीतील सर्व लहानांपासून मोठ्यांपर्यंत तात्या या नावाने सुपरिचीत असणारी ही व्यक्ती. पांगरी या गावाला पेपर वाचनाची सवय त्यांनी लावली असे म्हटल्यास वागवे ठरू नये. सकाळी पहाटे ५:३० वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम सुरू होतो. पेपरमध्ये एखादा चागंला लेख वा बातमी असेल तर ते आवर्जून शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनींसह सर्वांना सांगतात. त्यांच्या स्वभावामुळे ते सर्व पांगरीकरांना नेहमीच आपलेसेच वाटतात. वय वर्षे ८२ असताना सुध्दा त्यांचा उत्साह हा तरूणानां लाजवेल असा आहे .
वाढदिवस विशेष: सामान्यातील असामान्य माणूस म्हणजेच तात्या बोधे
उंच शरीरयष्टी स्वच्छ व ईस्तरी केलेले कपडे डोक्यावर गांधी टोपी घालून ते सकाळी पेपरची लाईन टाकण्यासाठी निघतात. नेहमी सर्वांशी गोड बोलणारे चांगला सल्ला देणारे असे वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध व्यक्तीमत्व. मी योगायोगाने त्यांच्या सहवासात आलो तेव्हा त्यांच्या विचारांची श्रीमंती किती मोठी आहे हे समजले. पांगरी सारख्या छोट्या गावात आज पाचशे वृत्तपत्रांचा खप होतो हे त्यांच्याच परिश्रमाचे फळ आहे. त्यांच्याशी मला विविध विषयांवर चर्चा करायची संधी मिळते.
ते म्हणतात कि “अरे . . माणसाला जगायला काय लागतं, गरजेपुरता पैसा असला की भागते पण संस्कार महत्वाचा. संस्कार, शिस्त नसेल तर कितीही पैसा आला तरी तो माणूस गरीबच हि त्यांची श्रीमंतीची व्याख्या मला खूप आवडली. माणसाजवळ किती पैसा आहे. तो किती श्रीमंत आहे यापेक्षा त्याची दानत किती आहे. यावरून त्याची श्रीमंती कळते असे त्यांचे विचार आहेत. अगदी लहान लहान मुले गणपतीची वर्गणी मागायला हक्काने त्यांच्या जवळ येतात तेही सर्वांना प्रेमाने वर्गणी देतात हा दातृत्वाचा गुण ही मी अनेक वेळा पाहिला.
त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अजून एक पैलू म्हणजे त्यांचे साहित्या विषयी असणारी आवड देशात जेथे कोठे मराठी साहित्य संमेलन असेल तेथे ते आवर्जुन जातात. पांगरी गावचे सरपंच म्हणून ही त्यांनी ५ वर्षे काम केले आहे. त्याकाळी पांगरी गावात लोक वर्गणीतून पहिली पाण्याची टाकी बांधण्याचे श्रेय ही त्यांचेच. लोकमतचे जेष्ठ पत्रकार म्हणून ही त्यांची ओळख आहे. लोकमतवर त्यांचे विशेष प्रेम मला दिसून आले. आज ही त्यांच्या घरावर मोठ्या ठळक अक्षरात लोकमत हे नाव दिसून येते. त्यांनी पेपरची सुरुवातच लोकमतच्या अंकापासून सुरू केली. पांगरीच्या ग्रामिण भागात लोकमत त्यांनीच रूजवला. सध्या ते साप्ताहिक कुतूहलचे वृत्तसंपादक म्हणून काम पाहत आहेत.
त्यांनी केलेल्या संस्काराच्या शिदोरिवरच आज त्यांचा मुलगा कोकणात शिक्षक म्हणून रूजू आहे. चारचाकी गाडी घेवून मुलगा जेव्हा गावी येतो तेव्हा कौतूकाने लोक तात्यांना तुमची गाडी असे म्हणतात. पण तात्या म्हणतात, “गाडी माझी नाही मला आयुष्यभर साथ देणारी जुनी सायकल व हे पेपर माझे आहेत.” असे मोकळ्या मनाचे व स्वभावाचे तात्या नेहमी आनंदी सकारात्मक आयुष्याचा निखळपणे आनंद घेतात. ते म्हणतात की मला पैसाच मिळवायाचा असता तर मी एखादा उद्योग सुरू केला असता पण वृत्तपत्र व्यवसायामध्ये मला आनंद मिळतो. समाजात मिसळण्याची संधी मिळते यातच मला खरे समाधान मिळते आहे.
२२ जुलै १९३९ ला तात्यांचा जन्म झाला. असा हा पांगरीच्या मातीने दिलेला मनस्वी व कलंदर सुपुत्रास ८२ व्या वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.
शब्दांकन: अमोल नांदेडकर, मो. ९७६३७७०४२३
जेष्ठ पत्रकार तात्या बोधे, मो. ९५५२६४८११७