fbpx

पांगरी जि.प.शाळेत सेवापूर्ती निमित्त केंद्र प्रमुख, मुख्याध्यापीका यांचा सन्मान

कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: बार्शी तालुक्यातील पांगरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड, पांगरी जि. प. प्राथमिक शाळा (मुले) येथील केंद्रीय मुख्याध्यापिका शैला कुलकर्णी व जि प शाळा उक्कडगाव येथील मुख्याध्यापक नवनाथ मुंडे यांच्या सेवापूर्ती निमित्त पांगरी येथील केंद्रीय शाळेत निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  विकास उकिरडे हे होते. प्रारंभी किशोर बगाडे, कौशल्या माळी व कार्यक्रमाचे अध्यक्ष यांच्या हस्ते सत्कारमूर्ती  केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड, शैला कुलकर्णी व नवनाथ मुंडे यांचा पांगरी केंद्राच्यावतीने त्यांच्या जोडीदारासह यथोचित सन्मान करून गौरव करण्यात आला. यावेळी केंद्रप्रमुख श्रीहरी गायकवाड यांची कन्या श्रद्धा गायकवाड हिने आपल्या वडिलांसाठी स्वकमाईतून घेतलेली अंगठी वडिलांना भेट दिली.

केंद्रातील शिक्षकांनी यावेळी सेवानिवृत्त होणाऱ्या सत्कारमूर्ती यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सत्कार मूर्तींनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रभारी केंद्रप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला बद्दल जावेद शेख यांचे स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमासाठी पांगरी केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अतुल खाडे यांनी तर आभार ऋषिकेश भाग्यवंत यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर बगाडे, प्रताप चौधरी, दत्तात्रय गोडसे, सुनील मोरे तसेच महिला शिक्षिका पंचफुला गायकवाड (बगाडे), नंदा भोसले, सुनिता बांगर, मंगल शेळके यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *