बार्शीचे IAS रमेश घोलप यांची झारखंडमध्ये महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती
कुतूहल मीडिया ग्रुप
प्रमोशनसह नवी जबाबदारी – जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीचे नेतृत्व घोलप यांच्याकडे
बार्शी: बार्शीचे सुपुत्र आणि भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी रमेश घोलप यांची झारखंड सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या विशेष सचिव आणि जल जीवन मिशनचे व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून पदोन्नतीसह महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या “हर घर नळ” उपक्रमांतर्गत जल जीवन मिशनची प्रभावी अंमलबजावणी ही त्यांच्याकडे सोपवलेली नवी जबाबदारी आहे.
प्रशासकीय अनुभव संपन्न
रमेश घोलप यांनी यापूर्वी कोडरमा, सरायकेला, गढवा आणि चतरा या चार जिल्ह्यांत जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. गढवामधील नक्षलग्रस्त ‘बुढा पहाड’ भागात शासन योजना पोहोचवणारे ते पहिले अधिकारी ठरले. चतरा जिल्ह्यात निवडणुका शांततेत पार पाडून त्यांनी आदिवासी भागात उल्लेखनीय कामगिरी केली.
इतर महत्त्वपूर्ण भूमिका:
- धनबाद महानगरपालिकेचे आयुक्त
- कृषी व उद्योग संचालक
- झारखंड राज्य सहकारी बँकेचे प्रशासक
- कोविड काळात NHM चे मिशन संचालक
संवेदना आणि शिस्त यांचा समतोल
कठोर प्रशासनशैलीसह गरिबांप्रती असलेली सहवेदना ही त्यांची खास ओळख आहे. बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाई करताना, वंचित घटकांसाठी विकासात्मक धोरणे राबवण्याची त्यांची कार्यशैली झारखंड राज्यभर कौतुकास्पद ठरली आहे.
संघर्षातून प्रेरणेकडे
सामान्य कुटुंबातून येऊन IAS अधिकारी बनलेले रमेश घोलप यांची जीवनगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. या नव्या जबाबदारीसाठी झारखंड आणि महाराष्ट्रातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.