कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
सामान्य घरातली माणसं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर जावू शकतात ही लोकशाहीची ताकद आहे. याच लोकशाहीच्या तत्वावर आपला पक्ष जनसामान्यांमध्ये वाढू शकतो, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी लातूर जिल्ह्यातील निलंगा व शिरुर अनंतपाळ विधानसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत व्यक्त केला. ”लोकांचे प्रश्न जर आपण हातात घेतले तर आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहोचेल. आपण कायम जर लोकांसाठी लढतोय हे चित्र तयार केले तरच आपला पक्ष वाढेल. यासाठी बुथ कमिट्या मजबूत करा, याच बुथ कमिट्या उद्या आपला पक्ष सक्षमपणे उभा करतील.” असे आवाहन त्यांनी केले.
लोकांचे प्रश्न आपण जर हातात घेतले तर आपला पक्ष तळागाळापर्यंत पोहचेल; जलसंपदा मंत्री जयंत पाटील
आज राज्यात विविध समाजघटकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यासोबतच पिक-बियांणांचे प्रश्न आहेत. आपण ते प्रश्न मांडले पाहिजेत. हा परिवार संवाद त्यासाठीच आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या परिवारात संवाद नसतो तो परिवार पुढे जात नाही. आपल्या लोकांच्या मनात काय आहे? हेच कळले नाही तर तो परिवार कसला. कुणावर अन्याय झाला तर न्याय देण्याची खबरदारी आम्ही घेऊ, असा विश्वास जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.
निलंगा मतदारसंघातील भाजपमधील दोन गटांना लोकं कंटाळली असल्याने आपण पर्याय उभा करण्याचे काम या मतदारसंघात निर्माण करु शकतो. बुथ कमिट्या तयार कराव्यात. त्यासाठी एक शिबिर आयोजित करण्यात येईल. पक्षासोबत खंबीरपणे उभे राहिले तर पक्ष निश्चित विचार करतो असा आत्मविश्वासही जयंत पाटील कार्यकर्त्यांना दिला.
यावेळी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राज्यमंत्री संजय बनसोडे, लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार बाबासाहेब पाटील, आमदार विक्रम काळे, मराठवाडा संपर्क प्रमुख जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, आशाताई भिसे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.