कुतूहल न्यूज नेटवर्क :दयानंद गौडगांव
पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात सध्या ओला-उबर-रॅपीडो सारख्या कंपन्यांनी बेकायदेशीररित्या बाईक टॅक्सीचा वापर करत तरूणांना रोजगार देण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र याचा थेट परिणाम रिक्षा व्यवसायावर होताना दिसत आहे.
पुण्यात बेकायदेशीर बाईक टॅक्सीचा धुमाकूळ; हजारो रिक्षा व्यावसायिकांच्या धंद्यावर होतोय परिणाम
बाईक टॅक्सी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही हे माहीत असून देखील या कंपन्यांनी दुचाकी प्रवासाला प्राधान्य देत आहेत. शिवाय यासाठी परिवहन विभागाने कोणतीच परवानगी दिलेली नसताना शहरात दुचाकी टॅक्सी सुसाट सुटत आहेत. बाईक टॅक्सीचे भाडे सर्वसामान्यांना अगदी परवडणारे असल्यामुळे सर्रास एकटे प्रवासी बाईक टॅक्सीचा वापर करत आहेत. यामुळे हजारो रिक्षाचालकांचे व्यवसाय धोक्यात आले आहे.
दरम्यान, बाईक टॅक्सी विरोधात शहरातील सर्व रिक्षा संघटनांनी विरोध दर्शविला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले. याची दखल घेत परिवहन विभागाने बेकायदेशीर बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नाही आहे.