विमल काळे : कुतूहल न्यूज नेटवर्क
अवैध वाळू उपसा; सोलापूर पोलीसांनी केला १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
सोलापूर: नंदूर ता. उत्तर सोलापूर येथील सीना नदी पात्रातील अवैध वाळू उपशावर पोलीसांनी कारवाई करत १६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई नंदूर येथील नदी पात्रात करण्यात आली. या प्रकरणात १७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नंदूर येथील सीना नदीकाठी असलेल्या नंदूरकर यांच्या शेतातून विनापरवाना वाळू उपसा करुन वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी छापा टाकला असता मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी १७ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकूण दहा ब्रास वाळू, एक मशीन, एक ट्रॅक्टर, तीन टेम्पो, ट्रक, एक जीप, तीन मोटरसायकली असा एकूण १६ लाख २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक खाजा मुजावर, हवालदार नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावले, पोलिस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांनी केली आहे.