कुतूहल न्यूज नेटवर्क
अक्कलकोट : दयानंद गौडगांव
वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक आनंदाचा क्षण असतो. अलीकडच्या काळात लहान मुले आणि तरूणाईंमध्ये वाढदिवस साजरा करण्याचा कुतूहल खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शिवाय वाढदिवसासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही केला जातो. पण अक्कलकोट तालुक्यातील नाविंदगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेतील गुणवंत खोसे या शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना झाडाचे महत्त्व पटवून सांगण्यासाठी चक्क विद्यार्थ्यांचाच वाढदिवस त्यांच्याच हाताने वृक्षारोपण करून साजरा करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. यास विद्यार्थी ही आवडीने सहकार्य करतात. कोणत्याही विद्यार्थ्यांच्या वाढदिवशी शाळेच्या आवारात, घराच्या अंगणात तसेच शेतामध्ये त्यांच्याच हस्ते झाडे लावून घेत जगासमोर एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
नाविंदगी जि.प.मराठी शाळेचा अभिनव उपक्रम; विद्यार्थ्यांचा वाढदिवस त्यांच्याच हाताने वृक्षारोपण करून होतो साजरा
वृक्ष ही काळाची गरज आहे. नैसर्गिक ऑक्सिजन देणारा हा सर्वात मोठा ऑक्सिजन प्लान्ट आहे. त्यामुळे मुलांचे वाढदिवस आपण ज्याप्रमाणे साजरे करतो, त्याप्रमाणे झाडांचे वाढदिवस साजरे करा. मुलांच्या शारीरिक विकासाकडे जसे लक्ष देतो तसेच वृक्षांच्याही विकासाकडे लक्ष द्या. एकंदरच वृक्ष लागवडीसोबतच वृक्षांचे संगोपन होईल.असे बहुमोल संदेशही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात येतो.
यादरम्यान या उपक्रमास शाळेचे मुख्याध्यापक मंगरुळे,लांबकाने ,डोंगरीतोट, हसरमनी जाधव या ही शिक्षका-शिक्षकांचा प्रतिसाद आणि प्रोत्साहन नेहमीच असतो. या शिवाय शाळेतील सर्व शिक्षकांनी देखील झाडाचे तसेच वृक्षारोपणाचे महत्त्व गावातील नागरिकांना पटवून देवून झाडाचे संगोपन व जतन करण्याचे आवाहन केले आहे.