कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटल मधील कंत्राटी कर्मचारी कायम होणार!
बार्शी : जागतिक परिचारिका दिनाच्या पूर्वसंध्येला श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ तसेच आयटक संलग्न जगदाळे मामा हॉस्पिटल श्रमिक संघ व हॉस्पिटलचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक होवून कामगारांना कायम करणे व इतर महत्त्वाचे निर्णय सकारात्मक व खेळीमेळीच्या वातावरणात घेण्यात आले. त्यामुळे हॉस्पीटल कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अधिक माहिती अशी की, या बैठकीमध्ये 7 कंत्राटी दाई, 8 नर्सेस व 1 वॉचमन यांना कायम करण्याचा निर्णय घेण्यात आला तसेच कायम कामगारांचे वेतन सर्व प्रकारचे आर्थिक लाभ व सेवा सुविधा देण्याचा निर्णय देखील एकमताने घेण्यात आला, तसेच कामगारांचा ताण लक्षात घेता हॉस्पिटल वाहनचालकांना जादा कामासाठी नियमाप्रमाणे भत्ता देण्याचा निर्णय देखील घेण्यात आला, कोवीड 19 ची परिस्थिती लक्षात घेता हॉस्पिटलमध्ये सर्व कामगारांना विशेष प्रोत्साहनपर भत्ता देण्याचे देखील संस्थेने मान्य केले. या बैठकीमध्ये, जगदाळे मामा हॉस्पिटल हे उस्मानाबाद, बार्शी भागांमधील रुग्णांची सेवा करण्यात महत्त्वाचा भाग उचलत आहे याचा आढावा घेण्यात आला, हॉस्पिटल कर्मचारी, संस्थेचे पदाधिकारी, हॉस्पिटल प्रशासन हे जिद्दीने या कामांमध्ये सहभागी होत रुग्णांची सेवा तत्पर व गुणवत्तापूर्वक तसेच दर्जेदार पद्धतीने देत असल्याने त्यांचे कौतुक करण्यात आले. कोवीड चा कार्यकाळ संपताच संघटना, संस्था या उभयतांनी व्यापक स्वरूपात कामगारांसोबत संवाद साधण्याचा निर्णय घेत संघटनेस पत्र देण्यातआले.
या बैठकीमध्ये संस्थेच्या वतीने अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, उपाध्यक्ष बी.टी. पाटील, सेक्रेटरी बापू शितोळे, आरोग्य समितीचे दिलीप रेवडकर, हॉस्पिटल सुप्रिडेंन्ट डॉ. रामचंद्र जगताप, प्रशासनाधिकारी महादेव ढगे, त्यासोबतच संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड तानाजी ठोंबरे कार्याध्यक्ष लहू आगलावे, सचिव प्रवीण मस्तुद, सहसचिव भारत भोसले यांनी सहभाग नोंदवला.