कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
मुंगशी प्रतिनिधी (काशीनाथ क्षीरसागर): बार्शी तालुक्यातील अनेक भागात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. हा पाऊस पांगरी, शिराळे, चिंचोली, पांढरी, घारी-पुरी, धानोरे, चिखर्डे, कारी, नारी, मळेगाव, जामगाव (पा), जामगाव (आ), तांदूळवाडी, खामगाव, ढेंबरेवाडी,घोळवेवाडी, गोरमाळे, ममदापूर, कुसळंब, आगळगाव, दहिटणे ,मुंगशी (वा) ,सासुरे ,तडवळे, ढोराळे, यावली, राळेरास, शेळगाव, पानगाव, लाडोळे, उपळे, इर्ले, सुर्डी, मालवंडी, पिंपरी, हिंगणी, मळेगाव सह अनेक भागात झाला.
परिसरातील प्रामुख्याने ज्वारी ,गहू, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचबरोबर द्राक्ष पिकाला ही फटका बसला आहे. ज्वारीचे पीक तर अक्षरशा शेतामध्ये झोपून गेले आहे त्यामुळे पुढच्या वर्षी खाण्यासाठी लागणारी ज्वारी, गहू आणायची तरी कुठून हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे गतवर्षी झालेल्या अति पावसाने शेतकऱ्यांचे पार कंबरडे मोडून गेले होते त्यातच हा अवकाळी पाऊस आल्याने शेतकरी मोठा हतबल झालेला दिसत आहे.
हातातोंडाशी आलेला घास आपल्या डोळ्यादेखत त्याचे नुकसान शेतकरी आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहत आहे गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे शेतकरी बिकट परिस्थितीतून आपला प्रपंच गाडा चालवीत होता गेल्या वर्षीच्या पावसाने ही शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन तरी देखील शासनाने त्यांनी भरलेल्या पीक विम्याची रक्कम अद्याप देखील शेतकऱ्याच्या खात्यावर जमा केली नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलेला आहे तरी शासनाने अवकाळी पावसाची दखल घेऊन झालेल्या ज्वारी, गहू, हरभरा व द्राक्षे पिकांचे नुकसानीचे पंचनामे त्वरित करून शेतकऱ्यांना योग्य ती भरपाई द्यावी अशी मागणी आता परिसरातील शेतकरी करीत आहेत.