fbpx

बार्शी एम.आय. डि. सी बाबत मंत्रालयात खासदार, आमदार अन् माजी आमदारांच्या उपस्थितीत बैठक

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी :
महाराष्ट्र राज्याच्या उद्योग, पर्यटन, क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत बार्शीच्या औद्योगिक विकास महामंडळाच्या (MIDC) बाबत आढावा बैठक झाली. सदर बैठक बोलावण्याची मागणी खा. ओमराजे निंबाळकर, आ. राजेंद्र राऊत व माजी आमदार दिलीप सोपल यांनी पत्राद्वारे केली होती.

आज मुंबई येथे राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत बार्शीतील एम.आय.डि.सी. निर्माणच्या सद्यस्थितीच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सदर बैठकीत भूखंडाचे दर कमी करण्याची मागणी आ. राऊत यांनी केली. तसेच एम.आय.डी.सी. करीता बार्शी नगर परिषदे मार्फत अल्पदरात पाणीपुरवठा देण्याची तयारी ही यावेळी राऊत यांनी दर्शबली. सदर ठिकाणी नवीन वीज उपकेंद्राची उभारणी तातडीने करण्यासंबंधी मागणी करण्यात आली असून, यापूर्वीही ऊर्जामंत्री मा. नितीन राऊत यांना या ठिकाणच्या वीज उपकेंद्र उभारणीबाबत पत्र व्यवहार केलेला आहे.

यावेळी मंत्रीमहोदयांनी बैठकीतील या सर्व चर्चेनंतर येत्या १५ दिवसांत औद्योगिक विभागाचे सहसचिव व संबंधित अधिकाऱ्यांनी बार्शीला भेट देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या. त्याचप्रमाणे मंत्री महोदयांकडे बार्शी शहरातील क्रीडा संकुलाच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी यावेळी सोपल व राऊत यांनी केली. सदरची निधीची मागणीला त्यांनी सकारात्मकपणे प्रतिसाद देऊन क्रीडा संकुलाच्या विकासासाठीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे सूचना संबंधितांना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *