कुतूहल न्यूज नेटवर्क
उस्मानाबाद : आसिफ मुलाणी
सोशल मीडियामुळे अनेक गोष्टी आता सहज सुलभ झाल्या आहेत. सध्या प्रत्येक जण व्हाट्सअपचा वापर करत आहे. व्हाट्सअप ग्रुप वर इकडचे तिकडचे मेसेज फॉरवर्ड करणे, वायफळ चर्चा करणे याव्यतिरिक्त काही साध्य होताना दिसत नाही. परंतु अशा व्हाट्सअप ग्रुपना अपवाद काही सामाजिक बांधिलकी जपणारे ग्रुप आहेत. त्याचे झालं असे की आंबेजवळगे येथील ग्रा. पं. सदस्य बालाजी जाधव यांनी अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी लागणाऱ्या पैशाच्या मदतीचा मेसेज सोशल मीडियावर झळकला अन् समाजातील दानशूर नागरिकांनी आपल्या पद्धतीने मदतीसाठी हात पुढे केला.
मदतीसाठी मेसेज सोशल मीडियावर फिरला उपचारासाठी उभारली १लाख ९२ हजार रुपयांची मदत
उपचारासाठी १ लाख ९२ हजार रुपयांची मदत जमा झाली. यावेळी माणुसकी जिवंत असल्याचा प्रत्यय आल्याचे पहावयास मिळाले. मूळ गाव हिंगळजवाडी सध्या वास्तव्यास आंबेजवळगे (ता. जि. उस्मानाबाद) येथील ओम बिबिषण शिंदे हे कसपटे यांच्या मधुबन नर्सरी गोरमाळे याठिकाणी मॅनेजर म्हणून काम पाहत आहेत. शिंदे २० डिसेंबर सायंकाळी पाच वाजता गोरमाळे याठिकाणी कामावर जात असताना दुचाकीला धडक बसून त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या घरी आई, पत्नी, मुलगा व मुलगी आहे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने शिंदे यांच्या उपचारासाठी खर्च मोठा आहे. सध्या बार्शी येथील श्री भगवंत हॉस्पिटलमध्ये डॉ.पडवळ यांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत.
ओम शिंदे यांच्या डोक्याला व पायाला मार लागला असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी जास्त खर्च येणार आहे. समाजातील जे नागरिक मदत करू इच्छितात त्यांनी माझ्या ९९२२६८११९८ या नंबर वर गूगल पे, फोन पे करावे. बालाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य