कुतूहल न्यूज नेटवर्क
नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडण्यावर बंदी; ‘या’ राज्याने घेतला निर्णय
दिवाळीप्रमाणेच आता नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठीही फटाके फोडण्यावर बंदी घालण्याचा निर्णय मिझोरम सरकारने घेतला आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून मिझोरम सरकारने हा निर्णय घेतला आहे. करोना रुग्णांबरोबरच श्वासनासंदर्भातील आजर असणाऱ्यांना फटके फोडल्याने होणाऱ्या वायू प्रदूषणामुळे आरोग्यासंदर्भातील समस्या निर्माण होतात. हाच मुद्दा लक्षात घेत ही बंदी घालण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी राज्य सरकारच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये राज्याचे गृहमंत्री लाचमलिआना सुद्धा उपस्थित होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय़ या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
फटक्यांप्रमाणेच आकाशात सोडण्यात येणारे कंदील आणि खेळ्यातल्या बंदूकींवरही बंदी घालण्यात आली आहे. “या बंदीसंदर्भातील अधिकृत आदेश आणि पत्रक लवकरच उपायुक्तांच्या माध्यमातून जारी केली जातील,” अशी माहितीही सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. फटाके बंदीच्या आदेशाचे कडेकोट पालन करण्यासंदर्भातही या बैठकीमध्ये चर्चा झाली. नाताळ तसेच नववर्षाच्या स्वागतासाठी फटाके फोडले जाणार नाहीत यावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने विशेष पोलीस चौक्या उभारण्याबरोबरच गस्ती पथकांची नेमणूक करण्यावरही एकमत झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विशेष म्हणजे मिझोरम सरकारने लागू केलेल्या या फटकेबंदीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत आहे की नाही यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस दलाबरोबरच विशेष कोव्हिड टास्क फोर्सचीही मदत घेतली जाणार आहे. कोव्हिड टास्क फोर्सही फटाके फोडणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याने ही बंदी अधिक परिणामकारक ठरेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. मोझिरोममध्ये नवी वर्षाच्या स्वागतासाठी आणि नाताळानिमित्त मोठ्याप्रमाणात फटाके फोडले जातात. मात्र या वर्षी सरकारने करोनाच्या पार्श्वभूमीवर नियम अधिक कठोर केले असून लोकांनी शांततापूर्ण पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत करावे तसेच करोनाच्या रुग्णांना अधिक त्रास होऊ नये म्हणून नाताळाचा सणही प्रदूषण न करता, फटाके न फोडता साजरा करावा या हेतूने हे निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यातील आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे उपाध्यक्ष डॉ. झेड. आर. थाईमसांग यांनी यंदा नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत साध्या पद्धतीने केले जाईल असं म्हटलं आहे.