fbpx

आमदार राऊत यांनी घेतली कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक

आमदार राजाभाऊ राऊत यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक संपन्न

कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर ओमायक्रॉन या विषाणूचा प्रसार राज्यासह देशभरात मोठ्या प्रमाणावर होत असून रूग्णसंख्या वाढत आहे. बार्शी तालुक्यात सध्या कोवीड रुग्ण संख्या आटोक्यात असून, सध्यातरी ओमायक्राॅन बाधीत रूग्णसंख्या नाही. परंतु भविष्यात ती रूग्णसंख्या वाढू नये व ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग होवू नये म्हणून करावयाची उपाययोजना, त्याची खबरदारी व काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेनेचे योग्य प्रकारे नियोजन करण्यासाठी आज तालुक्यातील वैराग, पानगाव, तडवळे, गौडगांव, श्रीपत पिंपरी, आगळगांव, उपळे दु. व राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, बार्शी या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आमदार राजेंद्र राऊत यांनी घेतली.

बार्शी तालुक्यात कोरोना लसीकरण जवळपास शंभर टक्क्यांच्या आसपास झालेले असल्यामुळे, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव आपल्या तालुक्यात कमी प्रमाणात राहील अशी अपेक्षा आहे. परंतु आपण याबाबत गाफील न राहता पूर्वी कोरोनाच्या दोन लाटेत ज्या पध्दतीने प्रशासन, आरोग्य विभागाने चांगल्याप्रकारे काम करून कोरोनाचा संसर्ग रोखला, त्याच पद्धतीने या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर करावयाच्या उपाययोजना, खबरदारी व काळजी घेण्यासाठी योग्य नियोजन करणे याबाबत बैठकीत चर्चा झाली.

तसेच दिनांक ३ जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची मोहीम संपूर्ण भारत देशात, तसेच बार्शी तालुक्यात सुरू झालेली आहे. हे लसीकरण प्रभावीपणे तालुक्यात राबवून कोणीही वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यासाठी चर्चा झाली.

या बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूध्द पिंगळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ढगे, डॉ. संतोष जोगदंड, नोडल अधिकारी डॉ. सुधीर घोडके, डॉ. शिवाजी थोरात, डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. प्रसाद कदम, डॉ. महेश पाटील, डॉ. दिनेश डमरे, डॉ. एकनाथ निरगुडे, डॉ. संगिता कुलांगे, डॉ. अंजली शेळके, डॉ. अनिता बांगर, डॉ. पूजा थिटे, डॉ. वृषाली पाटील, डॉ. प्रतिभा गायकवाड, डॉ. नितीन लाड, डॉ. समीर उकरंडे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *