कुतूहल न्यूज नेटवर्क
आमदार यशवंत माने यांची मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट
वाळूज, (दि.17): मोहोळ विधानसभा मतदारसंघातील मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातून वाहणाऱ्या भोगावती, नागझरी, व सीना नदीला मागील दोन दिवसापूर्वी आलेल्या महापुरात वाळूज, देगाव, नरखेड, डिकसळ, एकुरके या गावांसह परिसरातील शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांच्यासह आमदार यशवंत माने यांनी भेट दिली.
या भेटीदरम्यान, आमदार यशवंत माने यांनी वाळूज तालुका मोहोळ येथील एसटी स्टँड परिसरा मधील हॉटेल व दुकानांमध्ये नदीच्या शिरलेल्या पाण्यामुळे झालेले नुकसानीची पाहणी केली. इतिहासात प्रथमच पुलावरून पाणी वाहत होते असे सांगितल्यानंतर प्रत्यक्ष पुलावर जाऊन पाण्याच्या पातळी विषयी माहिती घेतली. तसेच वैराग मोहोळ रोड वरील वाळूज ते देगाव दरम्यान खचलेल्या डांबरी रस्त्याची पाहणी करून अधिकाऱ्यांना तात्काळ उपायोजना करण्यास सांगितले. जवळच असलेल्या पाण्यात असलेल्या पेरूच्या बागेची देखील पाहणी केली.
देगाव तालुका मोहोळ येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा वाहून गेलेल्या भरावाची म्हणजेच बंधाऱ्याच्या झालेल्या अडचणीची पाहणी केली. हा भराव तात्काळ भरून घेण्याचे आश्वासन दिले. तसेच डिकसळ येथील बंधाऱ्याच्या झालेल्या पडझडीची, तसेच नरखेड येथील सिद्धेश्वर मोटे यांच्या शेतातील पिकाच्या नुकसानीची, एकुरके येथील सीना नदी काठच्या परिसराची देखील पाहणी केली.
या पाहणी दरम्यान भोगावती नागझरी व सीना नदीला आलेल्या महापुरामुळे या नद्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेली पिके वाहून गेल्याने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. महाविकास आघाडी शासन शेतकऱ्यांसोबत असून पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असून स्थानिक प्रशासनाने तात्काळ पंचनामे करावेत अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी लोकनेते साखर कारखान्याचे चेअरमन बाळराजे पाटील यांनी गाव पातळीवरील अधिकाऱ्यांना, नागरिक व शेतकऱ्यांना सहकार्य करून शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या प्रत्येक भागाचे पंचनामे करण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांनी वीज पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला असता संबंधित अधिकाऱ्यांना आ.यशवंत माने यांनी फोन लावून लवकरात लवकर वीजपुरवठा चालू करण्यास सांगितले. यावेळी अधिकाऱ्यांनी देखील आम्ही लवकर वीज पुरवठा चालू करण्याचा प्रयत्न करू असे सांगितले.
यावेळी लोकनेतेचे चेअरमन बाळराजे पाटील, सभापती रत्नमाला पोतदार, नागेश साठे, हणमंत पोटरे, बालाजी पवार, हरिभाऊ घाडगे, विजयकुमार पोतदार, तुकाराम पाटील, आप्पासाहेब काटे, सचिन मोटे, अतुल आतकरे, महेश दगडे, राजकुमार पाटील, अमर आतरे, गोविंद पाटील, प्रदीप साठे, बालाजी साठे, जगन्नाथ कोल्हाळ, पंडित ढवण,आबासाहेब धावणे, अनंत उरणे, सोमनाथ म्हेत्रे, संतोष ननवरे, शशिकांत कोल्हाळ, विलास साठे, सचिन खोचरे, यांच्यासह शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.