कुतूहल न्यूज नेटवर्क
धक्कादायक: प्रियकराच्या मदतीने जन्मदात्या आईनेच केली मुलाची हत्या
सोलापूर : आई आणि मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना सोलापुरात घडली आहे. विवाहबाह्य संबंधात अडथळा ठरत असल्याने जन्मदात्या आईनेच प्रियकराच्या साथीने आपल्या मुलाची हत्या केली आहे. सिद्धेश्वर सुभाष जाधव असं हत्या झालेल्या तरुणांचं नाव आहे तर मुक्ताबाई सुभाष जाधव असं हत्या करणाऱ्या कसाईचं नाव आहे.
माढा तालुक्यातील परितेवाडी शिवारात 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास केल्यानंतर सिद्धेश्वर सुभाष जाधव याच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याचं समोर आलं. धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या पोटच्या पोराचा खून आईने तिचा प्रियकर महादेव कदम याच्या मदतीने केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
माढा तालुक्यातील परितेवाडी शिवारात 25 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास सिद्धेश्वर सुभाष जाधव या 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. टेंभुर्णी पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्यावरून तसंच गुप्त माहितीच्या आधारे यासंदर्भात तपास करून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला.
गुरुवारी मध्यरात्री आईने आणि तिच्या प्रियकराने सिद्धेश्वर याच्या डोक्यात दगड घालून झोपेतच त्याचा खून केला. आणि तो मृत झाल्याची खात्री मिळतात काठीच्या साहाय्याने झोळी करून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या निर्जन ठिकाणी त्याचा मृतदेह चारीत फेकून दिला. त्यानंतर रक्ताने माखलेले कपडे त्यांनी जाळून टाकले तसंच रक्ताळलेली जागा साफ करुन घेतली.
तपास करताना त्यांना जेव्हा संशयाची सुई मुक्ताबाई जाधव हिच्याकडे आल्यानंतर तिला ताब्यात घेऊन घटनेची माहिती घेतली असता सारा प्रकार समोर आला. या घटनेनंतर महादेव कदम हा फरार होता मात्र ग्रामीण पोलिसांनी उंबरे पागे येथून त्याला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास सोलापूर ग्रामीणचे टेंभुर्णी पोलिस करत आहेत.