माऊली प्री इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
कुतूहल मीडिया ग्रुप
बार्शी: शहरातील दत्त नगर येथे असलेल्या माऊली प्री इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा शानदार समारोप झाला. या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कविताताई राऊत, किरण विभुते, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह पाटील आणि सचिवा अर्चना पाटील उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर मामासाहेब जगदाळे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी संगीत, नृत्य, लोककला, नाट्यप्रकार आणि सामाजिक संदेश देणारे कार्यक्रम सादर करत आपल्या कला कौशल्याचे प्रदर्शन केले. विशेषतः पर्यावरण संरक्षण, वृक्ष संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थ्यांनी प्रभावी संदेश दिले.
या वेळी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीस शुभेच्छा दिल्या आणि भविष्यात संस्थेस सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कविताताई राऊत यांनी विद्यार्थ्यांचे वैयक्तिक कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. कार्यक्रमाचे नियोजन अमोल जाधव, प्रेमा लंकेश्वर, मनीषा खडके यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण विभुते यांनी केले, तर प्रास्ताविक अर्चना पाटील यांनी केले आणि आभारप्रदर्शन विजयसिंह पाटील यांनी केले.