बार्शी : बार्शीतील शिवसेना कार्यालय आणि अन्नछत्र येथे झालेल्या तोडफोडीच्या घटनेनंतर एका युट्युब न्यूज चॅनेलने ९ ते १० वाजताच्या सुमारास तेथील चित्रीकरण केले होते. त्यावेळी येथील एकही डिजिटल फाटलेला नव्हता. तर, महापुरुषांची मूर्तीही चित्रीकरणात दिसत नव्हती. पण काही तासांनंतर पंचनामा करण्यासाठी पोलीस आले, त्यावेळेस डिजिटल फाटलेला दिसला. तसेच, महापुरुषांची मूर्तीची विटंबना झालेली दिसत आहे. त्यामुळे, पोलिसांनी दोन्ही व्हिडीओची सत्यता पडताळून सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिवभक्तांनी केली आहे.
महापुरुषांची प्रतिमेची विटंबना करणाऱ्या आरोपीला अटक करा, अशी मागणी करत बार्शीतील शिवभक्तांनी बुधवारी सायंकाळी ठिय्या आंदोलन केले. यावेळी, जय शिवराय प्रतिष्ठान, छत्रपती ग्रुप यांसह मोठ्या संख्येने शिवभक्त एकत्र जमले होते. तर, एका शिवभक्ताने अंगावर डिझेल ओतून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून महापुरुषांची प्रतिमेची विटंबना करणाऱ्या विकृत प्रवृत्तीवर गुन्हा नोंद करुन कारवाई करावी, अशीही मागणी शिवभक्तांनी केली आहे.