कुतूहल न्यूज नेटवर्क
पांगरी: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी बार्शी तालुक्यामधील पांगरी जिल्हा परिषद गटांमधील गावांचा गाव भेट दौरा दि. २० सप्टेंबर रोजी आयोजित केला होता. या अनुषंगाने त्यांनी पांगरी गावास भेट देऊन पांगरी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जनतेच्या आडी अडचणी जाणून घेऊन त्याच ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून मार्गी लावण्याचा प्रयत्न केला. तसेच पांगरीमधील विकास कामाबाबत चर्चा केली, त्यानंतर पांगरी येथील राजीव गांधी केंद्रीय निवासी आश्रम शाळेस सदिच्छा भेट दिली.
राजीव गांधी केंद्रीय आश्रमशाळेस खासदार ओमराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट
दरम्यान या शाळेचे संस्थापक अध्यक्ष माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. संजीव बगाडे यांनी त्यांचा सत्कार केला. पांगरी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या रेखा राऊत व गटशिक्षणाधिकारी साधना काकडे यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका किरण बगाडे यांनी केला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्षांनी आश्रमशाळेच्या अनुदानाची व्यथा मांडली. यामध्ये त्यांनी शाहू फुले आंबेडकर योजने अंतर्गत राज्यामध्ये सुरू असणाऱ्या अनुसूचित जातीच्या आश्रम शाळा जवळपास १७ ते १८ वर्षापासून कार्यरत असून अद्याप पर्यंत या शाळांना शासनाचे कसलेही अनुदान मिळालेले नाही. परंतु युती शासनाने दि. ८ मार्च २०१९ रोजी तपासणीच्या आधीन राहून राज्यांमधील १६५ आश्रमशाळांना २० टक्के अनुदान मंजूर केलेले आहे. या अनुषंगाने या आश्रमशाळेच्या दोन तपासण्या झालेल्या आहेत त्यांचे अहवाल देखील शासनाला पाठवलेले आहेत. असे असताना देखील अद्याप पर्यंत या आश्रमशाळांना कसलेही अनुदान मिळालेले नाही, त्यामुळे या आश्रम शाळेमध्ये शिकणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. तरी ही बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देऊन या शाळांना न्याय द्यावा अशी मागणी खासदारांकडे केली. खासदार निंबाळकर यांनी या शाळेच्या संदर्भातील विषय मुख्यमंत्र्यांकडे समक्ष भेटून लवकरात लवकर मार्गी लावतो असे आश्वासन दिले.
यावेळी बार्शी तालुका शिवसेनेचे अध्यक्ष प्रवीण काकडे, उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, पांडुरंग गपाट, विलास लाडे, अतिश बिशेन, संतोष खोसरे, ईटकुर येथील केंद्रीय आश्रम शाळेचे संस्थापक भारत मोरे, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
‘कुतूहल’ पत्रकारितेच्या चळवळी ला हातभार लावा ! या लिंकवर क्लिक करून सहभाग निधी देवू शकता. 100 रुपये 200 रुपये 500 रुपये Any Amount