fbpx

ऐंशीत संघर्ष करणाऱ्या शेतकरी जोडप्याला खा. ओमराजेंची आर्थिक मदत

कुतूहल न्यूज नेटवर्क

बार्शी : वयाची ऐंशी गाठली की बसलेल्या जागेवरुन उठणेही कठीण असते.मात्र धामणगावच्या (ता.बार्शी) नरहरी ढेकणे आणि सोजर ढेकणे वयोवृद्ध जोडीचा आजही जगण्यासाठी संघर्ष दिसून येत आहे. त्यांच्या कष्टाला सलाम करीत उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पन्नास हजारांची आर्थिक मदत केली आहे.

उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धामणगावला भेट दिल्यानंतर आर्थिक मदत करण्याचे वचन दिले होते. त्यानुसार धाराशिव तालुका प्रमुख सतिश कुमार सोमाणी , विभागप्रमुख सौदागर जगताप, बार्शी तालुका शिवसेना प्रमुख प्रविण काकडे, गणेश पवार, अमोल मुळे यांनी धामणगावात घरी जाऊन मदत केली.
पोटाला मूल बाळ नसल्याने स्वतः काम केलं तरच चार घास मिळणार हे त्यांना माहीत आहे. म्हणून दुखणं खुफणं सोडून उतारवयात घाम गाळणं नशिबी आलं. त्यात पाऊस वेळेवर पडला पण पेरलेले सोयाबीन कुठंतरीच उगवले.अशावेळी दुबार पेरणी करण्यासाठी आवश्यक बियाणे आणि ट्रक्टरला भाडे परवडणे अशक्य असलेल्या ढेकणे यांनी एकेरी नळ्याच्या सहाय्याने पेरणी केली.वाटीतून बी सोडणारे नरहरी ढेकणे आणि पेरणीचे साधन दोरीने ओढणाऱ्या सोजर ढेकणे हे विदारक चित्र शेतकऱ्यांची अवस्था दर्शविण्यासाठी पुरेशे आहे.पोटाची टीचभर खळगी भरण्यासाठी आजही अनेकांना संघर्ष करावा लागतो आहे.बारिक सारिक कारणांवरून विवाह मोडलेले आपण नेहमीच पाहतो, पण उन्हाचे चटके आणि समाजाचे लचके सोसत अनेक वेळा उपाशी राहून अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांना साथ देणाऱ्या जोडप्याचा समाजापुढे वेगळाच आदर्श दिसत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *