कुतूहल न्यूज नेटवर्क
११ एप्रिल रोजी होणारी MPSC ची परीक्षा पुढे ढकलली
मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) रविवारी म्हणजे ११ एप्रिल २०२१ रोजी होणारी महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब ची संयुक्त पुर्व परीक्षा २०२० पुढे ढकलण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.
राज्यातील कोरोनाची वाढती स्थिती लक्षात घेऊन या परीक्षेच्या तारखा एमपीएससी मार्फत नव्याने घोषित केल्या जातील असे ही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.ते पुढे म्हणाले की, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन आणि विद्यार्थी आणि विविध राजकीय पक्षांचे यासंदर्भातील मत आणि मागण्या विचारात घेऊन हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.ही परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही तसेच परीक्षा फॉर्म भरतांनाचे विद्यार्थ्यांचे वय गृहित धरले जाणार असल्याने वयाची ही अडचण येणार नसल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.बैठकीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार, विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, सचिव आबासाहेब जऱ्हाड यांच्यासह आयोगाचे प्रभारी सचिव संघ तवरेज आदी मान्यवर उपस्थित होते.