लॉकडाऊन नंतर जयंती हा पहिला मराठी चित्रपट धूमधडक्यात मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येतोय..
‘जयंती’ च्या प्रमोशन साठी मुंबई ते नागपूर सायकल रन
कुतूहल न्यूज नेटवर्क
मुंबई: १२ नोव्हेंबर ला हा चित्रपट रिलीज होतोय या चित्रपटाच टायटलच आहे “लोकांच्या हक्काच सण” या टायटल संबंधित प्रेरणा घेऊन शोएब बागवान या तरुणाने मुंबई (चैत्याभूमी) ते नागपूर (दीक्षाभूमी )दरम्यान अंदाजे एक हजार किलोमीटर सायकल रण चा संकल्प केला आहे आणि दि २४ ऑक्टोबर रोजी मुंबई मधून ही सायकल यात्रा सुरु केली आहे. आणि या सायकल यात्रेसोबत प्रेक्षकांना आणि तरुणांना हे आव्हान केल जातंय कि हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांनी थेअटर मध्ये जाऊन पहावा..
दशमी स्टुडिओज प्रस्तुत, मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ निर्मित आणि शैलेश नरवाडे लिखित व दिग्दर्शित “जयंती” हा एका नव्या धाटणीचा विषय असलेला बहुचर्चित सिनेमा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रदर्शित होणार असल्याची घोषणा सोशल मीडियावर करण्यात आली. जयंती हा चित्रपट त्याच्या हटके नावामुळे तसेच वेगळेपणामुळे प्रदर्शनाआधीच चर्चेचा विषय बनला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका करणारे कलाकार कोण या उत्सुकतेसोबतच पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकारांची सुद्धा सध्या जोरदार चर्चा आहे. बॉलिवूड मध्ये सुपरहिट झालेल्या आर्टिकल १५, मुल्क, थप्पड तसेच सुप्रसिद्ध मराठी चित्रपट नारबाची वाडी, देऊळ सारख्या अनेक दर्जेदार चित्रपटांना त्याच तोडीचं पार्श्वसंगीत ज्यांनी दिले असे मंगेश धाकडे यांनी जयंती सिनेमाला संगीत तसेच पार्श्व संगीत दिले आहे. भारतीय संगीतक्षेत्रात ज्यांचं नाव मानाने घेतले जाते असे गायक जावेद अली यांनी या चित्रपटातील दोन गीतांना आपला सुमधुर आवाज दिला असून सुप्रसिद्ध गीतकार गुरु ठाकूर यांनी चित्रपटाचे गाणे लिहिले आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ख्वाडा संकलित केलेल्या रोहन पाटील यांनी जयंती च्या संकलनाची धुरा सांभाळली आहे. शाळा, किल्ला या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांच्या रंगभूषेचे काम केलेल्या संतोष गिलबिले यांनी जयंतीच्या रंगभूषेचे काम सांभाळले आहे. चित्रपट सृष्टीत २० वर्षांहून अधिक अनुभव असलेले नितीन वैद्य यांची “दशमी स्टुडिओज” कंपनी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
“इतक्या प्रतीक्षेनंतर आपला सिनेमा प्रदर्शित होत असल्यामुळे एक दिग्दर्शक म्हणून चित्रपट प्रदर्शनाची उत्सुकता आहेच, परंतु जयंती च्या निमित्ताने एक नवा विषय प्रत्येकाला आपल्या आयुष्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्यास प्रवृत्त करेल याबाबत नक्कीच खात्री आहे” असे सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्माते शैलेश नरवाडे सांगतात.
“लोकांचा हक्काचा सण” म्हणत खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटाच्या कक्षा रुंदावणारा चित्रपट “जयंती” हा येत्या १२ नोव्हेंबर २०२१ रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांचे मनोरंजनरुपी प्रबोधन करेल यात मात्र शंका नाही.