दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
सांगवी बुद्रुक येथे खून,आरोपी 24 तासात जेरबंद
अक्कलकोट दि. 10 : तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील बोरी नदीच्या पात्रात अज्ञात आरोपीने एका 32 वर्षाच्या तरुणास ठार मारुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सुतळीचे पोत्यात पाय व मान एकत्र बांधून पाण्यात टाकून दिले होते. उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी व त्यांच्या पथकांना फक्त चोवीस तासात मुख्य चार संशयित आरोपींना जेरबंद करण्यात यश आले आहे.
याबाबतची माहिती अशी की, दि. 9 ऑक्टोंबर 2020 रोजी उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सांगवी बुद्रुक येथील नदी पात्रामध्ये पुलाखाली अनोळखी इसमाचा जीवे ठार मारुन पोत्यात बांधून टाकले अशी माहिती ग्रामस्थाकडून मिळाल्याने सोलापूर ग्रामीण पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलिस अधिक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कलप्पा पुजारी यांच्या नेतृत्वाखाली सहा.पो.नि.विलास नाळे, सहा.फौ.युसूफ शेख, पोहेकॉ आनंद गीते, पोहेकॉ नितीन सुरवसे, पो.ना.प्रविण वाळके, पोकॉ महेश कुंभार, पोकॉ बशीर शेख, पोकॉ दुधभाते या पथकाने घटनास्थळी भेट देवून पाण्यात उतरुन कुजलेल्या अवस्थेत असलेली प्रेत बाहेर काढुन प्रेताच्या अंगावर असलेली कपडे व टेलरमार्क यांचा धागा पकडून प्रेताच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली व घटनास्थळी घेवून आले.
सदरील नातेवाईकांनी आपलाच व्यक्ती असल्याचे सांगून त्याचे नाव मलप्पा नागप्पा सुणगार (वय 35, रा.हिरोळी, ता.आळंद, जि.कलबुर्गी) असल्याचे सांगून 2 ऑक्टोंबर 2020 रोजी भीमपूर येथे भजन ऐकण्यासाठी जातो म्हणून सांगून रात्री 9.30 वा. घरातून निघून गेला. तो परत न आल्यामुळे हिरोळी हद्दीतील मादन हिप्परगा पोलिस ठाणे येथे 4 ऑक्टोंबर 2020 रोजी तक्रार नोंदविण्यासाठी गेले असता याबाबत तक्रार नोंद नसल्याचे निष्पन्न झाले.तपास पो.नि.कलप्पा पुजारी यांनी हाती घेवून प्रेतावर योग्य पंचनामा व शवविच्छेदन करुन नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले.
घडलेल्या प्रकाराबाबत मयताचा भाऊ शाणप्पा नागप्पा सुणगार यांनी फिर्याद दिल्याने पो.नि.कलप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि.विलास नाळे, पो.हे.कॉ.अंगद गीते, पो.हे.कॉ.यमाजी चव्हाण, पो.हे.कॉ. मनोज भंडारी, पो.ना.प्रविण वाळके, पो.ना.धनु राठोड या पथकाने सोलापूरातील सायबर सेलच्या मदतीने गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी दुधनी येथे सैपन उर्फ गुटल्या इमाम बोबडे (वय 22) यास अटक करुन ताब्यात घेवून पोलिसांनी खाकी दाखविले असता आणखी तीन संशयित आरोपींचे नावे समोर आले.
अनिल शिवपुत्र लिंगशेट्टी (वय 22), वाघेशा ईरण्णा हमणशेट्टी (वय 30, तिघे रा.हिरोळी, ता.आळंद, जि.कलबुर्गी), संजय हिरु राठोड (वय 27, रा.गांधीनगर तांडा, दुधनी, ता.अक्कलकोट) यास अटक करुन कोणत्या कारणावरुन खून करण्यात आला याचे तपास काम जोमाने सुरु असून उत्तर पोलिस ठाण्याचे पो.नि.कलप्पा पुजारी यांच्या पथकाने चोवीस तासात या गुन्ह्याचा छडा लावला आहे.