कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: चारित्र्याच्या संशयावरुन पतीनेच पत्नीचा दोरीच्या सहाय्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पानगाव-कोरफळे रस्त्यावर घडली आहे. सोनाबाई सचिन येवले (35) असे मृत व्यक्तीचे नाव असून सचिन राजेंद्र येवले असे संशयित आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी मुलीच्या आत्याने वैराग पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर, तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक करण्यात आली आहे. मृत सोनाबाई आणि आरोपी सचिन यांस एक मुलगा व मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.
पानगाव-कोरफळे रस्त्यावर चार चाकी गाडीत गळा आवळून पत्नीचा खून
तारामती अंकुश पवार (58), यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून चारित्र्याच्या संशयावरुनच आरोपी सचिनने सोनाबाईचा गळा आवळून खून केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोनबाई आणि सचिन मूळ कळंबवाडीचे रहिवाशी असून ते कामानिमित्त डोंबिवली येथे राहतात. मात्र, डोंबिवलीत राहत असताना सोनाबाईने परपुरुषाशी संबंध ठेवल्याचे सचिनने सातत्याने गावाकडील नातेवाईकांना सांगितले. त्यावर, सोनाबाईला आत्या, मावशीसह तिच्या वडिलांनीही समजावून सांगितले. मात्र, तरीही सोनाबाईचे परपुरुषाशी संबंध होते, असा आरोप तिच्या पतीने केला आहे.
सोनाबाई आणि सचिन यांच्यातील वाद कुटुंबीयांनी मिटवल्यानंतर सचिनने 5 जून रोजी आपल्या एमएच 05 डीएच 9484 या पांढऱ्या रंगाच्या गाडीतून पत्नी सोनाबाईला घेऊन जात असल्याचे सांगितले. मात्र, पानगाव ते कोरफळे शिवारात संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सचिनने पत्नी सोनाबाईचा गाडीतच गळा आवळून खून केला. त्यानंतर, स्वत: सासरे चंद्रकांत जाधव यांना फोन करुन बोलावून घेतले. मी स्वत: पोलीस ठाण्यात जात असल्याचंही त्याने सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी पहाटे 4 वाजता घटनास्थळी धाव घेतली असून पांढऱ्या रगाची चारचाकी गाडी आढळून आली. त्यामधील, मृत सोनाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपात्रे हे करीत आहेत.