दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
Bharat Bhalke: आमदार भारत भालके यांचे उपचारादरम्यान निधन
पुणे प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी रुग्णालयात जाऊन भालके यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा भालके यांची प्राणज्योत मालवली असून राष्ट्रवादीसाठी हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. दांडगा जनसंपर्क असलेले भारत भालके यांनी विधानसभेवर निवडून जाण्याची हॅट्ट्रिक केली होती. ( NCP MLA Bharat Bhalke passes away )
ऑक्टोबर महिन्यात भारत भालके (Bharat Bhalke) यांना कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र, गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. त्यानंतर भारत भालके यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
त्यांना किडनी आणि मधुमेहाचा त्रास होता. गुरुवारी रात्रीपासून भारत भालके यांची तब्येत सातत्याने खालावत गेली. कोरोनामुळे त्यांच्या अवयवांवर परिणाम झाला होता. त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली होती. गेल्या काही तासांपासून ते जीवनरक्षक प्रणालीवर (व्हेंटिलेटर) होते.
भारत भालके हे पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर नेत्यांपैकी एक होते. १९९२ साली ते तालुका स्तरावरील राजकारणात सक्रिय झाले. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून त्यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. २००२ पासून त्यांना या कारखान्याच्या अध्यक्षपदावर आजपर्यंत कायम वर्चस्व ठेवले आहे.