दयानंद गौडगांव : कुतूहल न्यूज नेटवर्क
अखेर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांची बदली ; राजेश पाटील नवे पालिका आयुक्त
चिंचवड : गेल्या कित्येक दिवसांपासून आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आज पूर्णविराम मिळाला. महापालिका आयुक्त म्हणून गेल्या साडेतीन वर्षांपासून कार्यरत असलेल्या श्रावण हर्डीकर यांची पुणे येथे नोंदणी महानिरीक्षक आणि नियंत्रक मुद्रांक शुल्क या पदावर बदली झाली असून, त्यांच्या जागी राजेश पी. पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आयुक्तपदी श्रावण हर्डीकर हे गेली साडेतीन वर्षांपासून अधिक काळ कार्यरत होते. गतवर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांची बदली होईल, असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र त्यांनी काही कालावधी वाढवून मागितल्याने त्यांची बदली थांबली होती. यानंतर कोरोनाच्या आपत्तीमुळे त्यांना महापालिकेचे आयुक्त म्हणून कार्यरत रहावे लागले. त्यातच करोनाकाळात काही योग्य निर्णय घेतानाच त्यांनी कोरोनाचा अटकाव करण्यात यश मिळविल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना काही काळ वाढवून दिला होता.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते भाजपाचेच टार्गेट बनल्यामुळे तसेच वारंवार होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे त्यांनी स्वत:हून बदलीसाठी प्रयत्न चालविले होते. गत आठवड्यातच त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब होऊन त्यांच्या जागी राजेश पाटील यांच्या नियुक्तीला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविला होता. मात्र, अपेक्षित ठिकाणी बदली न झाल्यामुळे हर्डीकर यांनी बदलीचा आदेश स्वीकारला नव्हता. आता आज झालेल्या बदलीमध्ये त्यांची नोंदणी महानिरीक्षक या पदी बदली झाली आहे. तर राजेश पाटील हे महापालिकेचे आयुक्त म्हणून रुजू होणार आहेत.