बार्शी: चारी खोदण्याच्या किरकोळ कारणावरून एकास दगडाने मारहाण करून जखमी केल्याचा प्रकार बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) शिवारात घडला. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अरुण साहेबराव माळी (रा.उपळाई ठोंगे, ता.बार्शी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जखमी नागेश संपत वाघमारे (माळी), वय-25वर्ष, रा उपळाई ठोंगे ता बार्शी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते शेती व गॅरेज व्यवसाय करुन कुटुंबाची उपजिविका भागवितात. त्यांची उपळाई ठोंगे हद्दीत शेती आहे. त्यांच्या शेता शेजारीच चुलते अरुण साहेबराव माळी यांची शेती आहे. दि. २१ एप्रिल रोजी सायंकाळी 04.30 वा. चे सुमारास त्यांच्या शेतातील पावसाचे पाण्याचा निचरा करण्यासाठी जे.सी.बी.लावुन चारी काढत होतो. त्यावेळी त्यांचे चुलते अरुण साहेबराव माळी त्या ठिकाणी येवून म्हणाले की, तुम्ही शेतात चारी खोदायची नाही त्यावर फिर्यादींनी त्यांस मी माझे शेतातून पावसाचे पाणी जाण्यासाठी चारी काढत आहे. असे म्हणाले असता त्यांना त्याचा राग येवुन त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी, फिर्यादी त्यांना शिवीगाळ करु नका असे सांगत असताना त्यांनी तेथेच पडलेला एक दगड फिर्यादीच्या तोंडावर मारला. तो ओठाचे डावे बाजुस लागुन जखम झाली व त्यातुन रक्त येवु लागले. भांडणाचा आवाज ऐकुन फिर्यादीचे आई-वडिल तेथे आले त्यांनी भांडण सोडविले. याबाबत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.