कुतूहल न्यूज नेटवर्क
गरीब विद्यार्थ्यांकडे मोबाईल नसल्याने वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यादान
पांगरी प्रतिनिधी : कोरोनामुळे देशभरात शाळा बंद आहेत. अशा काळात मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून शासनाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षण प्रणाली (online education) सुरु केली आहे ; मात्र अजूनही वाड्यावस्त्यांवरील वंचित घटकातील विद्यार्थ्यांकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. अशा विद्यार्थ्यांसाठी पांगरी (ता. बार्शी) येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या शिक्षिका पंचफुला गायकवाड-बगाडे या वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक धडे देताहेत.
शेतमजूर, वेठबिगार, हमालांची मुले
पांगरी भागात वेठबिगार, गवंडी, भूमीहीन शेतमजूर यांची मुले मोठ्या प्रमाणात आहेत. या मुलांना अँड्रॉईड मोबाईल मिळणे दुरापास्त आहे. केवळ मोबाईलमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून पंचफुला यांनी वाड्यावस्त्यांवर जाऊन विद्यादान करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला या उपक्रमाला प्रतिसाद मिळाला नाही. मात्र हळू-हळू प्रतिसाद मिळाला आणि आज ऑनलाईनचा ऑफलाईन विचार प्रवाह कोरोना काळात सुरक्षिततेत विद्यार्थ्यांमध्ये पेरण्यात यशस्वी झाले आहेत.
ग्रामीण भागात अनेक शिक्षक हे प्रयोगशीलतेने विद्यादान करताहेत.अभ्यासक्रम प्रभावशाली ठरावा यासाठी वेगवेगळ्या क्लूप्त्या वापरतात आणि मुलांना चांगल्या पद्धतीने घडवताहेत. विद्यार्थ्यांसाठी झटणाऱ्यांपैकी पंचफुला गायकवाड एक.
त्या पांगरी परिसरातील वाड्यावस्त्यांवर जाऊन कोरोनाच्या पार्शभूमीवर सुरक्षित अंतर पाळत सॅनिटायझर वापरत शैक्षणिक धडे देताहेत.पाच-पाच विद्यार्थ्यांचे गट करून धडे देताहेत.सकाळी ८ ते दुपारी 1 पर्यंत मुलांना शिकवतात आणि स्वाध्यायमाला सोडवून घेताहेत.त्यानंतर त्यांची उजळणी करून घेताहेत.त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.केंद्रिय मुख्याध्यापिका श्रीमती. शैला कुलकर्णी व केंद्र प्रमुख श्री. श्रीहरि गायकवाड शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, पालक यांनी शिक्षिका पंचफुला गायकवाड यांचे अभिनंदन केले.