कुतूहल न्यूज नेटवर्क
बार्शी: कोरोना (Corona virus) काळात स्वत: चा जीव धोक्यात घालून 24 तास औषधींचा पुरवठा नियमित व सुरळीत व्हावा यासाठी झटणाऱ्या औषध विक्रेत्यांमध्ये केंद्र व राज्य सरकारबद्दल (State government) असंतोष खदखदतोय. याचे कारण म्हणजे या महामारीच्या काळात अत्यावश्यक सेवा देवूनही कोरोना योध्दा म्हणुन औषध विक्रेत्यांचा सन्मान करण्यात दोन्ही विसरले आहेत. आमचा कोरोना योध्दा म्हणून सन्मान करावा व लसीकरणास प्राधान्य द्यावे अन्यथा आम्ही आमची दुकाने बंद ठेवू (medical shop closed) असा इशाराच औषध विक्रेत्याच्या संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोविड 19 चे बळी पडले असून, 1000 च्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. असे असूनही केंद्र वा राज्य सरकारने कोविड योद्धा म्हणून सन्मान तर दिला नाहीच परंतु साधे लसीकरणात प्राधान्य देण्याचे औदार्य देखील दाखवले नाही याची खंत सर्व औषधी विक्रेते त्यांचे कर्मचारी यांच्या मनात असून ते सरकारच्या या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
संघटनेने वेळोवेळी केलेल्या पत्रव्यवहाराचीही दाखल शासनाने घेतली नाही. सरकारची भूमिका अशीच राहिल्यास सभासदांचा वाढता दबाव लक्षात घेता संघटनेला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. याची शासनाने गंभीर दखल घ्यावी. अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव व्यवसाय बंदची भूमिका घ्यावी लागेल. असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी तसेच बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष सुधीर राऊत, अभिजीत गाढवे, मोइझ काझी, गणेश बारसकर, हेमंत गांधी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिलेला आहे.